गॅसअभावी कुडाळातील काही हॉटेल्स बंद; पर्यटनावर परिणाम होण्याची भीती
प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची जिल्हा व्यापारी महासंघ व हाॅटेल संघटनेची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
आखाती देशांतील युद्ध परिस्थितीचा थेट परिणाम सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये जाणवू लागला असून कमर्शियल गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईमुळे जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेषतः कुडाळ येथे काही हॉटेल्सना मंगळवारपासूनच बंद ठेवण्याची वेळ आली असून ही परिस्थिती आता हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात पसरत असल्याचे चित्र आहे. यामुळे “पुढे काय करायचे?” हा गंभीर प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. व्यावसायिकांसमवेत बैठक लावून शासन आणि प्रशासनाने गॅस पुरवठ्याबाबत स्पष्ट भूमिका मांडून वस्तुस्थिती सांगावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि हॉटेल संघटनेने केली आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनप्रमाणे अनिश्चिततेत ठेवू नये, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद सभागृहात आज सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्हा हॉटेल संघटना, कुडाळ तालुका व्यापारी संघ आणि कुडाळ तालुका हॉटेल व लॉजिंग संघटना यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल संघटना अध्यक्ष राजन नाईक, कुडाळ तालुका व्यापारी संघ अध्यक्ष पीडी शिरसाट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यवाह नितीन वाळके यांनी सांगितले की, जिल्ह्यात वाणिज्यिक गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास पूर्णपणे ठप्प झाला आहे. कुडाळमधील सात मोठी हॉटेल्स कालपासून बंद ठेवावी लागली असून याचे लोण जिल्हाभर पसरत आहे. उर्वरित चालू असलेली हॉटेल्सही पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. अनेकांनी केवळ मर्यादित मेन्यू ठेवून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या व्यापारी महासंघाच्या तातडीच्या बैठकीत पर्यायी इंधन म्हणून विजेवर स्थलांतर करण्याचा पर्याय मांडण्यात आला. मात्र वाणिज्यिक वीज दर अत्यंत जास्त असल्याने ते निम्मे करून द्यावेत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही पत्र पाठविण्यात आले असल्याचे वाळके यांनी स्पष्ट केले.
ओरोस येथे नुकत्याच झालेल्या शांतता समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश मिळाले नसल्याचे सांगितल्याने व्यावसायिकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. गॅस टंचाईचा परिणाम केवळ हॉटेल व्यवसायापुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम संपूर्ण अर्थचक्रावर होणार आहे. पर्यटन व्यवसायही सुद्धा ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने तातडीने व्यावसायिकांसमवेत बैठक लावून गॅस सिलिंडर पुरवठ्याबाबत खरी वस्तुस्थिती आम्हाला सांगावी, जेणेकरून व्यावसायिकांना पुढील नियोजन करता येईल, असे नितीन वाळके म्हणाले. तर राजन नाईक यांनी जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन शासनाकडून व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. यावेळी जिल्हा हॉटेल संघटना कार्यवाह विलास कोरगावकर, द्वारकानाथ घुर्ये, राजू जठार, दीपक बेलवलकर, अमित सुखी, राकेश म्हाडदळकर, पंकज कामत, प्रसाद मालवणकर, संजय भोगटे, हेमंत देशपांडे, यश नाईक, प्रसाद नाईक, प्रमोद नलावडे, मधु नलावडे, दीपक भोगले, समीर खाडिये, नामदेव वाडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.







