कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील भंगसाळ नदीकाठी असलेल्या मुख्य गणेश घाटाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९० लाख रूपये खर्च करून सुसज्ज असा हा गणेश घाट बांधण्यात येणार आहे.
नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरीसुविधा पुरविण्यासाठी सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत कुडाळ शहरातील भंगसाळ नदीकिनारील मुख्य गणेश घाट सुशोभिकरणासाठी 90 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते व नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थित ऑक्टोबर महिन्यात या गणेश घाट बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्या या कामाने सध्या वेग घेतला असून, जोरदार काम सुरू आहे.
शहरातील हा मुख्य गणेश घाट असून या ठिकाणी शहरातील सर्वाधिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. मात्र या घाटा लगतच्या ओहोळालगतचा परिसर यंदा ढासळल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्याचबरोबर या गणेश घाटावर गणेश मुर्ती विसर्जन करताना गणेश भक्तांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या गणेश घाटाचे नूतनीकरण करण्यात यावे अशी आग्रही मागणी गणेश भक्त तसेच नागरिकांतून होत होती. याची दखल घेत शासनाकडून ९० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून हा मुख्य गणेश घाट बांधण्यात येत आहे, अशी माहीती नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.









