हत्तींच्या संकटानंतर बिबट्याचा उपद्रव; शेतकरी भीतीच्या छायेखाली
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची जोरदार मागणी
दोडामार्ग : प्रतिनिधी
पाळये परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून तीन दिवसात त्याने दुसऱ्या पाळीव जनावराचा फरशा पाडला आहे. येथील शेतकरी चिमणो वरक यांच्या बकरीवर हल्ला चढवत तिला ठार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत.
तिलारी खोऱ्यात एका बाजूने हत्तीचे संकट गडद झाले आहे. या हत्तींच्या उपद्रवातून शेतकरी पुरता हवालदिल झाले असताना आता या शेतकऱ्यांवर बिबट्याचे दुहेरी संकट कोसळले आहे. या बिबट्याने मागील सहा दिवसांत तीन पाळीव जनावरांना ठार केल्याची घटना घडली आहे. पाळये येथे मंगळवारी सायंकाळी बिबट्याने एका गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार केले होते. ही घटना ताजी असतानाच गुरूवारी सायंकाळी येथील शेतकरी चिमणो वरक यांच्या एका बकरीवर बिबट्याने हल्ला चढविला व तिला ठार केले. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.






