दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांना ‘कलासिंधू सन्मान’ पुरस्कार जाहीर!
रिल्स मालवणीचे आयोजन; मालवणी भाषा दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कलाकारांचा गौरव

कुडाळ : प्रतिनिधी
सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो… अशी टॅगलाईन घेऊन रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉलच्या सभागृहात मालवणी अवार्ड २०२६ या शो चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कला सिंधु सन्मान पुरस्काराने दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षभरात मालवणी भाषेत उल्लेखनीय काम केलेल्या कलाकारांचा मालवणी अवार्ड पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे, अशी माहीती रिल्स मालवणी ग्रुपचे अध्यक्ष तुषार तळकटकर व सदस्य निलेश गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली. हि पत्रकार परिषद आज येथील मराठा समाज हॉल येथे झाली.
४ एप्रिल हा मालवणी नाट्यसम्राट मच्छिन्द्रनाथ कांबळी यांचा जन्मदिवस. हा दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाचे औचित्य साधून रिल्स मालवणी यांच्या वतीने हा मालवणी अवार्ड शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. यावेळी मालवणी भाषेसाठी काम करणा-या कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत, सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार, सर्वोत्कृष्ट मालवणी चित्रपट, सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मालवणी कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालवणी वेबसीरीज, सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्यसंस्कृती, सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्ट फिल्म व सर्वोत्कृष्ट मालवणी रिल अशा कॅटेगरीतील कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोकण वाचवा या विषयावर मालवणी रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचा निकाल यावेळी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच यंदा कलासिंधू सन्मान पुरस्कारासाठी दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांची निवड करण्यात आली असून, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहीती अध्यक्ष श्री.तळकटकर व श्री.गुरव यांनी यावेळी दिली. तर हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून, सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन क्रिएटिव्ह हेड तेजस मसके यांनी यावेळी केले. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर, सदस्य रामचंद्र आईर, पुजा सावंत-उपळेकर, भावेश तळवलकर आणि उपेंद्र पवार आदी उपस्थित होते.









