वैभव नाईक पुन्हा आमदार होऊन राज्याचे नेतृत्व करतील – परशुराम उपरकर
संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही; जनतेचा पाठिंबा आमच्यासोबत – वैभव नाईक
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ–मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज (बुधवारी) कुडाळ येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. गुरुवार, दि. 26 मार्च रोजी वाढदिवस असला तरी त्याच्या पूर्वसंध्येला कुडाळ मधील महालक्ष्मी हॉलच्या सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आयोजित मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वैभव नाईक यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वैभव नाईक यांच्या राजकीय भवितव्याबाबत ठाम विश्वास व्यक्त करत ते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील, असे सांगितले. निवडणुकीतील आश्वासनांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात पराभवानंतरही न डगमगता काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही. सत्ता नसली तरी लोकांचा पाठिंबा आमच्यासोबत आहे,” असे ते म्हणाले. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात, मात्र आम्ही लोकांसाठी कायम उभे राहणार आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच पक्षनिष्ठेचा पुनरुच्चार करत कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले.
उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, कृष्णा धुरी, अतुल बंगे यांनीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी भाषणे केली. या कार्यक्रमात दशावतार कलाकारांचा सन्मान करण्यात आला. पावशीतील सातेरी दशावतार नाट्य मंडळाच्या कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. तसेच रिक्षा व्यावसायिकांसाठी विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आयोजित या कार्यक्रमाला युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, वैभव नाईक यांची पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक, मुलगी नंदीनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, रूपेश पावसकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, अवधूत मालंडकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, तालुका संघटक सचिन कदम, अॅड.सुधीर राऊळ, संदीप महाडेश्वर, अमित राणे, गोट्या चव्हाण, बाबी गुरव, बंड्या कोरगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









