ठळक घडामोडी

बच्चे कंपनी सज्ज व्हा! कणकवलीत २४ जानेवारीला खाऊ गल्लीत धमाल!

कणकवलीत ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’; समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन

कणकवली : प्रतिनिधी
      कणकवली शहरातील लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे होणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहीती माजी नगराध्यक्ष तथा मित्रमंडळाचे अध्यक्ष समीर नलावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
     या खाऊ गल्लीत सहभागी होणाऱ्या १ हजार लहान मुलांना प्रत्येकी ५० रुपयांचे कुपन मोफत देण्यात येणार असून या कुपनच्या माध्यमातून मुले विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खरेदी करू शकणार आहेत. स्थानिक नागरिकांना फूड स्टॉल लावण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय कार्यक्रमात लहान मुलांसाठी चॉकलेट वाटप (सरप्राईज बक्षिसांसह), फनी गेम्स, जादूगारांचे मनोरंजन, गोव्यातील कलाकारांकडून टॅटू आर्ट, तसेच दोन आकर्षक सेल्फी पॉईंट्स असणार आहेत. पालकांसाठी मराठी व हिंदी गाण्यांचा धमाकेदार ऑर्केस्ट्राही या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे, असे नलावडे म्हणाले.
     नलावडे म्हणाले की, कणकवलीकरांनी आपल्याला राजकीय आणि सामाजिक प्रवासात नेहमीच साथ दिली आहे. जरी सध्या कोणत्याही पदावर नसलो तरी कणकवली शहराशी माझी बांधिलकी कायम आहे. लहान मुलांसाठी ‘एक दिवस बच्चे कंपनीसाठी’ या संकल्पनेतून हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो आणि यंदाही मित्रमंडळाच्या सहकार्याने तो तेवढ्याच उत्साहात पार पडणार आहे. कणकवलीतील पालक व नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या खाऊ गल्लीत सहभागी व्हावे, असे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे. यावेळी अण्णा कोदे, राजू गवाणकर, राजा पाटकर, नवराज झेमणे, जावेद शेख, राज नलावडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!