शिंदे शिवसेना – भाजप महायुतीची रणनिती ठरतेय
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच राजकीय वातावरण तापू लागले आहे. सध्या नगरपंचायतीवर सत्ता असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या महायुतीने पुन्हा एकदा कुडाळवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांनी आतापासूनच मायक्रो लेव्हल प्लॅनिंग सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
एका हॉटेलमध्ये नुकतीच महायुतीमधील दोन पक्षाच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीत ‘एकदिलाने लढायचे आणि पुन्हा सत्ता मिळवायचीच’ असा ठाम सूर उमटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नगरपंचायतीतील सत्तासंतुलन सध्या काठावर असल्याने प्रत्येक प्रभागात काटेकोर रणनीती आखण्याचे ठरले आहे.
नगराध्यक्षपद ‘खुले’; इच्छुकांची लगबग वाढली
कुडाळ न. प. च्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण ‘खुले’ पडल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. महायुतीकडून संभाव्य उमेदवारांची यादी मोठी असल्याची चर्चा असली तरी अंतिम नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये पडद्यामागील हालचाली वेग घेत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महायुतीची त्रिसूत्री; बूथस्तरावर फोकस
महायुतीकडून बूथस्तरावर संघटन मजबूत करणे, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणे आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे या त्रिसूत्रीवर काम सुरू आहे. ‘प्रभाग जिंका, नगरपंचायत जिंका’ हा फॉर्म्युला राबविण्याची तयारी दिसून येते.एकूणच, कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आतापासूनच रंगू लागली आहे.









