चुकीचे निर्णय घेतल्यास कडाडून विरोध करणार – समीर नलावडे
फेक नेरेटिव्हमुळे पराभव; तरी शहर विकासासाठी सहकार्य राहणार
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली शहरातील नागरिकांच्या समस्या, अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी आजपासून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून आपण जनसेवा करणार असल्याचे सांगत न.पं.त सत्ताधाऱ्यांकडून चुकीचे निर्णय घेतले गेले तर त्याला कडाडून विरोध केला जाईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.नलावडे बोलत होते. नगरपंचायत निवडणुकीतील पराभव आपण स्वीकारला असून शहरवासीयांनी दिलेला कौल मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कणकवली नगरपंचायत निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढलो. निवडणुकीत विरोधकांनी फेक नेरेटिव्ह पसरवल्याने गैरसमज निर्माण झाला व त्याचा फटका बसल्याचे ते म्हणाले. कणकवली नगरपंचायतीत भाजपचे बहुमत असून शहराच्या विकासासाठी आपण व भाजपचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना सहकार्य करतील, मात्र विकासविरोधी वा चुकीच्या निर्णयांना तीव्र विरोध केला जाईल, असे नलावडे यांनी सांगितले. आपण कट्टर राणे समर्थक असून खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे हाच माझा पक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीपूर्वी शहर विकासासाठी मंजूर झालेला १३.५ कोटींचा निधी आचारसंहितेमुळे रखडला होता. आता ही कामे मार्गी लावण्यासाठी भाजप नगरसेवक पाठपुरवठा करतील, असेही त्यांनी सांगितले. पर्यटन महोत्सव, खाऊ गल्ली यांसारखे उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त करत शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे समीर नलावडे यांनी स्पष्ट केले.







