कुडाळ : प्रतिनिधी
“हे खरं असूच शकत नाही…” महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दु:खद निधनाची बातमी समजताच कुडाळसह संपूर्ण कोकणात हीच भावना उमटली. ग्रामीण भागातून उभे राहिलेले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने महाराष्ट्र आज पोरका झाला आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल आज कुडाळ येथे सर्वपक्षीय व नागरिकांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कुडाळ मधील मराठा समाज हॉलच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी अजितदादा पवार यांचे कार्य तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.के.गावडे, सावळाराम अणावकर, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, व्हिक्टर डांटस, नितीन वाळके, काका कुडाळकर, राजू राऊळ, अभय शिरसाट, राजन नाईक, शिवाजी घोगळे, आत्माराम ओटवणेकर, उमेश गाळवणकर, सुंदर सावंत, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, द्वारकानाथ घुर्ये, विद्याप्रसाद बांदेकर, प्रफुल्ल सुद्रिक, नम्रता कुबल, राकेश कांदे, जयराम डिगसकर, प्रा.अरूण मर्गज, राजेंद्र राणे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. स्व.अजित पवार यांच्या निधनाने राज्याने एक अनुभवी व कर्तृत्ववान नेतृत्व गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.









