४२० किलो सागरी कचरा हटविला; ‘वनशक्ती’चा पुढाकार
मालवण : प्रतिनिधी
सागर तळ स्वच्छता मोहीम (Marine Debris Cleanup Initiative – Phase II) अंतर्गत ५ वी मोहीम वनशक्ती द्वारे यशस्वीरित्या पार पडली
दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मालवण किनारपट्टी परिसरात सागर तळ स्वच्छता मोहीम – टप्पा II अंतर्गत ५ वी स्वच्छता मोहीम वनशक्ती द्वारे यशस्वीरित्या पार पडली. ही मोहीम Maharashtra Pollution Control Board, Mangrove Cell (वन विभाग), Malvan Nagar Parishad, Neel Kranti, Youth Beats for Climate Change तसेच स्थानिक स्कुबा डायव्हर्स यांच्या सहकार्याने राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान सुमारे ४२० किलो सागरी कचरा समुद्राच्या तळातून व किनारपट्टीवरून बाहेर काढण्यात आला. यात घोस्ट नेट्स (त्यागलेली मासेमारी जाळी), प्लास्टिक बाटल्या, काचेच्या बाटल्या, विविध प्लास्टिक वस्तू व दोरखंड यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. विशेषतः घोस्ट नेट्स हे समुद्री जीवांसाठी प्राणघातक सापळे ठरत असून मासे, कासव आणि इतर जलचर त्यात अडकून मृत्यूमुखी पडत आहेत. ही बाब सागरी जैवविविधतेसाठी अत्यंत चिंताजनक आहे.
मालवण किनारपट्टी ही जैवविविधतेने समृद्ध असून स्थानिक मत्स्यव्यवसाय, पर्यटन व अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र वाढता प्लास्टिक कचरा आणि अयोग्य कचरा व्यवस्थापनामुळे समुद्र व किनारे गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत.
या निमित्ताने सर्व नागरिक, मच्छीमार बांधव, पर्यटक, विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांना आवाहन करण्यात येते की, सागर तळ स्वच्छता मोहिमेत पुढाकार घ्यावा, प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि समुद्रात कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा.“आपला समुद्र – आपली जबाबदारी” सागरी संपत्तीचे संरक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. चला, एकत्र येऊन सागर तळ स्वच्छ ठेवूया.









