भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर – धोंडू चिंदरकर
मालवण : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे जागावाटप आणि एबी फॉर्मवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. आम्ही खासदार नारायण राणे यांचे आदेश मानणारे आहोत, पण कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. जर आमच्या विरोधात एबी फॉर्म दिले जात असतील, तर गप्प बसणार नाही. प्रसंगी माझ्या देहाचे बलिदान देईन, पण कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही अशा शब्दांत चिंदरकर यांनी महायुतीतील अंतर्गत वादाला वाचा फोडली.
येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेवक मंदार केणी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. चिंदरकर म्हणाले की, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मसुरे, आडवली-मालडी, चिंदर, कोळंब, देवबाग, सुकळवाड आणि वराड या जागांचे एबी फॉर्म माझ्याकडे सुपूर्द केले होते. युतीमध्ये भाजपला सुटलेल्या जागांव्यतिरिक्त कोणालाही फॉर्म देऊ नका, अशा स्पष्ट सूचना होत्या. मात्र तरीही भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात छुप्या पद्धतीने एबी फॉर्म दिले गेले. हा प्रकार पक्षादेशाला तिलांजली देणारा असून ज्यांनी हे कृत्य केले, त्या जिल्हाप्रमुखांवर खासदार राणे कारवाई करणार का? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.









