ग्रामस्थांचा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार – दादा साईल
पावशी जि.प. मतदारसंघात प्रचाराचा झंझावात – अणावला खळा बैठक
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अणाव दाभाचीवाडी येथे रविवारी रात्री महायुतीची खळा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीदरम्यान अणाव दाभाचीवाडी व परिसरातील ठाकरे सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सरचिटणीस तथा पावशी जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार दादा साईल यांनी आज पणदूर येथे दिली. त्यांनी पणदूर येथील शिवसेना शाखेत माध्यमांशी संवाद साधला.
महायुतीचे पावशी जि.प. उमेदवार दादा साईल व डिगस पंचायत समितीचे उमेदवार निखिल कांदळगावकर यांच्या प्रचारार्थ ही खळा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ निवडणूक प्रभारी काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत अणावचे माजी सरपंच व ठाकरे सेनेचे कार्यकर्ते चंद्रशेखर माळवे, शाखाप्रमुख नाना माळवे, गोपाळ नेमळेकर, दत्ताराम कुंभार, सिताराम केसरकर, उल्हास सावंत, सदानंद माळवे, सुवर्णा माळवे, दिप्ती कुंभार, रमेश केसरकर, कल्पना केसरकर यांच्यासह अणाव दाभाचीवाडी व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचे दादा साईल यांनी यावेळी सांगितले.
या प्रवेशामागील भूमिका स्पष्ट करताना दादा साईल म्हणाले की, तत्कालीन खासदार-आमदार तसेच तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांकडून या भागातील जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन तसेच आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. तसेच दाभाचीवाडी व अणाव परिसरातील ग्रामस्थांनी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे दादा साईल यांनी सांगितले.









