‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत चित्ररथाद्वारे नागरिकांना संदेश!
युवा पिढीला ड्रग्जपासून वाचविण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये मोहिम

कुडाळ : प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे ‘नशा मुक्त भारत अभियान’ या व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीपर चित्रफितीने सज्ज चित्ररथ सोमवारी सायंकाळी कुडाळ शहरात दाखल झाला. त्यानंतर पंचायत समिती, बसस्थानक, पोस्ट ऑफिस चौक, पोलीस स्टेशन तसेच शहरातील अन्य प्रमुख ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यसनाचे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगत व्यसनमुक्तीचे आवाहन करण्यात आले.
डॉ. सचिन परब यांनी सांगितले की, ‘नशा मुक्त भारत अभियान’ हा भारत सरकारचा उपक्रम असून भारत सरकार आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रग्जसारख्या अंमली पदार्थांचा प्रवेश होत असल्याची चिंताजनक बाब समोर येत असून युवा पिढी त्याच्या विळख्यात अडकण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनाधीन व्यक्तींना मानसोपचार, औषधोपचार व राजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून व्यसनातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, ही मोहीम पुढील एक महिनाभर सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांनी जनजागृती कार्यक्रमासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ब्रह्माकुमारी हर्षादीदी यांनी सांगितले की, या अभियानाचा शुभारंभ ओरोस येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झाला असून त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. आता हा जनजागृती रथ कुडाळात दाखल झाला असून शहरातील विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
अॅड. राजीव बिले यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी ‘नशा मुक्त भारत अभियान’ सारखे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. या मोहिमेत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला बांदेकरभाई, सुरेशभाई, भास्कर केरवडेकर आदींसह नागरिक उपस्थित होते.









