ठळक घडामोडी

कौटुंबिक वादाचा थरार…कालेलीत पतीकडून पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला!

सासऱ्याविरुद्ध सुनेची कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार; संशयिताला पोलीस कोठडी

कुडाळ : प्रतिनिधी
         कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळत डोक्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना कुडाळ तालुक्यातील कालेली-आंगचेकरवाडी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
        या प्रकरणी रमेश गणपत चव्हाण (वय 57) याच्याविरुद्ध त्याची सून वैदेही विकास चव्हाण (वय 32) यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
     स्वयंपाकघरातील वादातून ठिणगी
     घटनेच्या आदल्या दिवशी (दि. 26 फेब्रुवारी) रात्री सुमारे आठच्या सुमारास सून वैदेही स्वयंपाकघरात भाकऱ्या करत असताना रमेश चव्हाण स्वयंपाकघरात गेले.मी तुझ्या हातचे जेवण खाणार नाही, बाजूला हो, असे म्हणत त्यांनी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
वाद चिघळताच त्यांनी सुनेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी पत्नी रेश्मा यांनी पतीला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
       दि. 27 फेब्रुवारी रोजी सून वैदेही पती व मुलांसह माहेरी मुळदे येथे रवाना झाली. त्यानंतर दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास रमेश चव्हाण यांनी पत्नी रेश्मा यांच्यावर संताप काढल्याचा आरोप आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पत्नी बेडवर पडल्या असताना रमेश यांनी त्यांचा गळा आवळून मुलगा-सुनेची बाजू घेतेस? असे म्हणत धमकी दिली. कशाबशा सुटून त्या न्हाणीघराच्या दिशेने पळाल्या. मात्र आरोपीने पाठलाग करत घरातील कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केला.गंभीर जखमी अवस्थेत त्या घराबाहेर रस्त्यावर आल्या; तेथे चक्कर येऊन कोसळल्या. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांना मुळदे येथे हलविण्यात आले आहे.
          या घटनेच्या तक्रारीनंतर कुडाळ पोलीस ठाणे यांनी तात्काळ कारवाई करत रमेश चव्हाण याला अटक केली आणि आज  संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती साटम आणि पोलीस निरीक्षक आर. ए. मगदूम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!