सभापती मिलिंद नाईक – उपसभापती सिताराम तेली यांची उपस्थिती
कुडाळ : प्रतिनिधी
आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका यांच्या दिनानिमित्त कुडाळ येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, डॉ. कविता पराडकर (वैद्यकीय अधिकारी, पणदूर), तेजू खांडेकर, रवींद्र गावडे, राघोजी चेंदवणकर, महादेव तेली, लिपिक विलास गोसावीआदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभापती मिलिंद नाईक व उपसभापती सिताराम तेली यांनी आशा स्वयंसेविकांशी संवाद साधत त्यांचे मनोगत ऐकून घेतले. ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यात स्वयंसेविकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाच्या आरोग्य उन्नतीसाठी आशा स्वयंसेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी स्वयंसेविकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन स्नेहा सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रकाश तेंडोलकर यांनी केले. शेवटी स्नेहा सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.









