ठळक घडामोडी

आता ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी!

कुडाळच्या प्रांताधिकाऱ्यांची माहीती : १७ ते २४ डिसेंबरदरम्यान अर्ज सादर करण्याचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
      राज्यात खरीप हंगाम, 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करण्याबाबत दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. तसेच खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पहाणी करण्याबाबत मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
    ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम 2025 मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दिनांक 17 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत पिकांची नोंद करण्याकरिता अर्ज सादर करावेत. तसेच संबंधित शेतकरी यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दाखल केलेल्या अर्जाची पोहोच घ्यावी असे आवाहन कुडाळच्या उपविभागीय अधिकारी (महसूल) ऐश्वर्या काळुशे यांनी केले आहे.
     प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे संबंधित शेतक-यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी ही दिनांक 25 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये करतील व सदर स्थळपाहणी करण्यापूर्वी समितीमार्फत स्थळपाहणीची दिनांक व वेळ निश्चित करून त्याची पूर्व कल्पना संबंधित शेतकऱ्याला, शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान 4-5 शेतकऱ्यांना लेखी स्वरुपात देण्यात येईल. प्रत्यक्ष स्थळपाहणीच्या दिवशी खरीप हंगाम 2025 मध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची लागवड केली होती त्याची स्थानिक चौकशी करून पीक नोंदणीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक पंचनामा करावा व शेताच्या बांधाला लागून असलेले इतर शेतकऱ्यांचे जाब जबाब नोंदविण्यात येतील. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी गाव नमुना नं 12 वर यापुर्वी प्रतिबिंबित झालेली नाही, त्या शेतकऱ्यासंदर्भात ही प्रक्रिया अवलंबिण्यात येणार आहे, अशी माहीती काळुशे यांनी दिली.
   कुडाळ – मालवण मधील शेतकऱ्यांना आवाहन!
    तरी कुडाळ व मालवण तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम 2025 मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे दिनांक 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत पिकांची नोंद करण्यासाठी अर्ज सादर करावेत असेही आवाहन उपविभागीय अधिकारी (महसूल) ऐश्वर्या काळुशे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

error: Content is protected !!