कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर तसेच सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यावर गेल्या १३ वर्षांपासून असलेले अतिक्रमण पोलीस संरक्षणात अखेर बुधवारी हटवण्यात आले आहे. कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेनंतर प्रशासनाने धडक कारवाई करत हे अतिक्रमण दूर केले. या कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकत आ. राणे व प्रशासनाचे आभार मानले आहेत.
नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत तसेच ये-जा करण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. सन २०१२ मध्ये शिक्षण विभागाने मोजणी करून हद्द निश्चित केली होती. मात्र, संबंधितांनी त्या मोजणीला न जुमानता जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून नारळाची रोपे लावली व पत्र्याचे शेड उभारले होते. परिणामी वाडीतील ग्रामस्थांचा सार्वजनिक मार्ग बंद होऊन त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा मोजणी करण्यात आली असता संबंधितांनी त्यास विरोध केला. अखेर शिक्षण विभागाने ही बाब आ. निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आ. राणे यांनी तात्काळ प्रशासनाला चौकशी करून रीतसर व कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.
शिवसेना नेते दत्ता सामंत व माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक यांनी ग्रामस्थांच्या वतीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासकीय आदेश प्राप्त होताच यंत्रणा कार्यान्वित झाली आणि अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
कारवाईदरम्यान गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी ग्रामस्थांना आश्वस्त करत सांगितले की, प्रशासन नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहील. काहीवेळा कामास दिरंगाई होऊ शकते, मात्र चुकीची बाजू कधीही घेतली जाणार नाही. तसेच भविष्यात उपलब्ध निधीतून हा रस्ता पक्का करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
अतिक्रमण हटवताना ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी उल्लेखनीय एकजूट दाखवत श्रमदान केले. अक्षय शिंदे, जितेंद्र परब, प्रसाद परब, अमेय शिंदे, अंकुश जोशी, गौरव ठाकूर, अक्षय जोशी, रमेश जोशी, मोहन जोशी, काशिनाथ जोशी, सिद्धेश सामंत, राजन नाईक, संकेत वरक, संजय वरक, अमित ठाकूर, गणेश ठाकूर, अमोल ठाकूर, सिद्धेश ठाकूर, विजय ठाकूर, साईश ठाकूर, हर्षद ठाकूर, प्रथमेश ठाकूर, नागेश ठाकूर, सुहास ठाकूर, अजय जोशी, उदय जोशी, मारुती ठाकूर, अमृता शिंदे, अंकिता शिंदे, दिपाली ठाकूर, जान्हवी परब, प्राची परब, संज्योति जोशी, करिष्मा जोशी, नंदिता गव्हाणकर, मीनाक्षी जोशी, रश्मी जोशी, अनामिका ठाकूर, आरती ठाकूर, सुहासिनी नाईक, कल्पना ठाकूर आदी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
प्रशासनाचे मानले आभार
या यशस्वी कारवाईबद्दल ग्रामस्थांनी पोलीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडपिसे,अधीक्षक मोहन दहीकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगधूम यांच्यासह सर्व संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी सरपंच भक्ती गाडी, पोलीस पाटील सुरेश नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष चव्हाण व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.










