वैभववाडी : प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी या ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक भर घालत अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, सांगुळवाडी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून बी.एम.एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि १०० खाटांचे श्री. राजन पाटील आयुर्वेदिक रुग्णालय कार्यान्वित झाले असून त्यामुळे संपूर्ण तालुका व जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक दालन खुले झाले आहे. या नव्याने सुरू झालेल्या आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील, उपप्राचार्य डॉ. पाताडे, डॉ. महेश जयवंत पाटील, रुग्णालयाचे सुपरटेंडंट डॉ. सौदात्ती यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात मेडिकल कॉलेजसारखा दर्जेदार अभ्यासक्रम सुरू करून अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाने शिक्षणाच्या क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमुळे वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ सांगुळवाडीसारख्या दुर्गम ग्रामीण भागात विविध महाविद्यालयांची स्थापना करून शिक्षणाची दारे विद्यार्थ्यांसाठी खुली केली आहेत. आज या संस्थेमुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी विविध पदव्या संपादन करून उज्ज्वल भवितव्य घडवत आहेत. नव्याने सुरू झालेल्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व रुग्णालयाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ही संस्था भविष्यातही शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







