ठळक घडामोडी

मालवणात मच्छिमारांचा एलईडी मासेमारीविरोधात संताप; मत्स्य विभाग कार्यालयावर धडक

“अनधिकृत मासेमारीमुळे उपासमारीची वेळ”; स्थानिक मच्छिमारांचा उग्र आंदोलनाचा इशारा

मत्स्य विभागाचे आश्वासन; १२ नॉटिकल अंतरात कडक कारवाई करणार

मालवण : प्रतिनिधी
     मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या अनधिकृत एलईडी लाईट मासेमारीवर कारवाई होत नसल्याबाबत मालवण मधील मच्छिमार नेते व मच्छिमारांनी आज मालवण मधील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक देत सहाय्यक मत्स्यआयुक्त सागर कुवेसकर यांना जाब विचारला. यावेळी मच्छिमारांनी अनेक प्रश्नांचा भडीमार पारंपारिक मच्छिमारांनी करत एलईडी सारख्या अतिरेकी व बेकायदेशीर मासेमारीमुळे आम्हा छोट्या व पारंपारिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आल्याने पून्हा उग्र संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असा इशारा मत्स्य विभागाला इशारा दिला.
     यावेळी मच्छीमार नेते छोटू सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, मिथुन मालंडकर, अन्वय प्रभू, सन्मेष परब, भाऊ मोर्जे, महेश कोयंडे, जगदीश खराडे, सुजित मोंडकर यांच्यासह बहुसंख्येने पारंपारिक मच्छिमार उपस्थित होते.
     एलईडी लाईट मासेमारीला केंद्र तसेच राज्य शासनाची परवानगी नसताना राज्य शासनाच्या सागरी हद्दीत पर्ससीन नौकांद्वारे एलईडी लाईट मासेमारी कशी काय केली जाते? यावर मत्स्य विभागाचे लक्ष नाही का? तसेच किनाऱ्यावर असणारे मत्स्य विभागाचे सागरी सुरक्षा रक्षक याची माहिती मत्स्य विभागाला देत नाहीत का ?असे सवाल यावेळी मच्छिमारांनी उपस्थित केले.
     अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांना पकडल्यावर दीर्घकाळासाठी अवरुद्ध करून कठोर कारवाई करावी, असे मच्छिमारांनी सांगितले. मत्स्य विभाग केवळ बाहेरून आलेल्या एलईडी नौकांवर कारवाई करत आहे, मात्र जिल्ह्यातील अनेक स्थानिक मच्छीमार एलईडी लाईट मासेमारी करत असून त्यांच्या नौका का पकडल्या जात नाहीत ? असा सवाल मच्छिमारांनी केला.
    पालकमंत्री तथा मत्स्योद्योग मंत्री व स्थानिक आमदार यांनी तीन महिन्यापूर्वी अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे पुढे काय झाले? अनधिकृत पर्ससीन व एलईडी लाईट मासेमारीला खासदार, पालकमंत्री व आमदार हे जबाबदार असल्याचा आरोप यावेळी मच्छिमारांनी केला.
      मत्स्य विभागाकडून आम्हाला न्याय मिळत नाही. गेली अनेक वर्षे आम्ही संघर्ष करत असून आरता पून्हा उग्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा यावेळी मच्छिमारांनी दिला. यावर सहायक मत्स्य आयुक्त सागर कु्वेसकर यांनी समुद्रात बारा नॉटिकल सागरी अंतरात होणाऱ्या प्रत्येक अनधिकृत मासेमारीवर मत्स्य विभाग कठोर कारवाई करेल, असे आश्वासन मच्छिमारांना दिले.

error: Content is protected !!