कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसाद रेगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष अजित दादा पवार यांच्या अकाली निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.ते म्हणाले की, हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः सिंधुदुर्गसाठी मोठा धक्का आहे. “अजित दादांचे नेतृत्व जनतेच्या हृदयाशी जोडलेले, बोले तैसा चाले असे ते व्यक्तिमत्व होते, प्रशासनावर पकड ठेवणारे आणि विकासाला गती देणारे होते. त्यांचा असा नेहमीचा स्पष्ट आणि ठाम शब्द आता गमावला गेलाय,” असे रेगे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पवार कुटुंबीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. “पवार कुटुंबीयांवर झालेला आघात आमच्यावरही परिणाम करणारा आहे. ईश्वर त्यांच्या दुःखाला सहन करण्याची ताकद देवो,” अशी प्रार्थना त्यांनी केली.श्री रेगे यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि नंतर दुपारी बारामतीकडे रवाना झाले.









