

प्रभाग क्र. ५ मधील उमेदवार सुजाता पाटेकर यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या माध्यमातून मुंबईला वाचवण्यासाठी सर्व मराठी शक्ती एकत्र आल्या आहेत. अदानींसारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई जाऊ देऊ नका, असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी मुंबईवासियांना केले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्र. ५ मधील शिवसेना (उबाठा)–मनसे–राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युतीच्या उमेदवार सौ. सुजाता उदेश पाटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत वैभव नाईक बोलत होते. या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वैभव नाईक म्हणाले की, ठाकरे शिवसेना आणि मनसेची युती जाहीर झाल्यापासून शिवसैनिक व मनसैनिक खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू असून, १९६० मध्ये मुंबई वाचवण्यासाठी १०८ हुतात्म्यांनी बलिदान दिले. आजही सत्ताधाऱ्यांकडून मुंबई तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुंबईच्या हितासाठी ठाकरे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत. ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी मते विकत घेण्यासाठी पैसे देतील, मात्र हे पैसे कुणाचे आहेत, हे मतदारांनी ओळखले पाहिजे. “हे पैसे अदानींचे आहेत. सत्ताधाऱ्यांनी मुंबई अदानींच्या हाती सोपवली आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे. अदानींसारख्या उद्योगपतींच्या घशात आपली मुंबई जाता कामा नये,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी सौ. सुजाता पाटेकर तसेच युतीतील सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या सभेला दहिसर-मगाठाणे विभागप्रमुख, माजी नगरसेवक उदेश पाटेकर, श्री. परब, पांडुरंग गावडे, मनसे विभाग अध्यक्ष यांच्यासह ठाकरे शिवसेना, मनसे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









