वाळू परवान्यांचे नूतनीकरण रखडले : व्यावसायिक एकवटले
वाळू परवाना चालू करण्याबाबत निवेदनातून वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष

कुडाळ : प्रतिनिधी
चालू वर्षातील ऑक्टोबर महिन्यापासून वाळू परवाना प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी या व्यवसायाशी निगडित असलेले अनेक घटक, जसे की गवंडी कामगार, डंपर मालक-चालक, हार्डवेअर स्टोअर्स, लाकूड व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, घरकुल लाभार्थी तसेच शासकीय ठेकेदार आणि बिल्डर व्यावसायिक या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे २५ डिसेंबर २०२५ पूर्वी जिल्ह्यातील वाळू परवाना प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, आणि वाळू व्यावसायिक व डंपर व्यावसायिकांना दिलासा देण्यात यावा. अन्यथा २८ डिसेंबर २०२५ नंतर संपूर्ण जिल्ह्यातील सर्व डंपर वाळू व्यावसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले डंपर उभे करून धरणे आंदोलन करतील, असा इशारा सिंधुदुर्ग डंपर व वाळू व्यावसायिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
जिल्ह्यात वाळू (रेती) परवान्याचे नूतनीकरण रखडल्यामुळे डंपर मालक आणि वाळू व्यावसायिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याबाबतचे व्यावसायिकांनी एकवटत शुक्रवारी संघटनेने सिंधुदुर्गनगरी येथे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षातील वाळू परवाना अद्याप झालेला नाही. प्रतिवर्षी ऑक्टोबर महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होते. परवाना न मिळाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत परवान्यासाठी अर्ज मागविले होते. यात ५८ वाळू परवानाधारकांनी सहभागी होऊन सर्व प्रक्रिया आपल्या विभागातून मंजूर करून घेतली. यामुळे सर्व परवानाधारकांनी कागदपत्रे आणि यंत्रसामुग्रीची जुळवाजुळव केली. परंतू आज पर्यंत पुढील परवाना प्रक्रियेची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे डंपर व वाळू व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर लिलाव २५ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावा आणि डंपर व वाळू व्यावसायिकांना दिलासा द्यावा. अन्यथा, २८ डिसेंबर २०२५ नंतर संपूर्ण जिल्ह्यातील सर्व डंपर वाळू व्यावसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले डंपर उभे करून धरणे आंदोलन करतील, असा इशारा सिंधुदुर्ग डंपर व वाळू व्यावसायिक संघटनेने या निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने वाळू व डंपर व्यावसायिक उपस्थित होते.








