ठळक घडामोडी

बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करा!

महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आढावा बैठकीत आदेश

अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई होणार

शून्य थकबाकीचे उद्दिष्ट ठेवून वीज बिल वसूल करा – दत्तात्रय पडळकर

कुडाळ : प्रतिनिधी
      महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर असून चालू वीजबिल व थकबाकी वसूलीचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करा. त्याकरता शून्य थकबाकीचे उद्दिष्ट समोर ठेवून ग्राहकाने वापरलेल्या प्रत्येक युनिटच्या वीज बिलाची वसुली करा. ग्राहकांना अखंड वीजपुरवठा देण्याच्या दृष्टीने वीज यंत्रणेची नियमित देखभाल दुरुस्ती करा, असे आदेश महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी आज दिले.
     महावितरणच्या सिंधुदुर्ग मंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी महावितरण रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंते अरविंद वनमोरे(कुडाळ), सौरभ माळी(कणकवली) व्यवस्थापक (वित्त) महेंद्र पावसकर उपस्थित होते.
     यावेळी कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर म्हणाले, ग्राहकाकडून वीज बिल एक रक्कमी भरून घ्या, कोणत्याही स्थितीत पार्ट पेमेंट/ बिलाचे टप्पे करू नका. वीज ग्राहकांच्या थकबाकी वसुली करता कृती आराखडा करून त्यानुसार काम करा. वीज बिल थकबाकीदारांची वीज जोडणी तोडा.  ग्राहकाने पुनर्रजोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज जोडणी करा. याकरता जिल्हा स्तरावर विशेष पथक तयार करा. शासकीय कार्यालयांची थकबाकी तात्काळ व प्राधान्याने वसूल करा. मीटर रिडींग व बिलिंग प्रचलित नियमानुसार करा. आज ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकाने वेळेत बिल न भरल्यास ग्राहकाची वीज जोडणी तात्काळ तोडा, असे आदेश कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी दिले. यावेळी कामात हयगय केल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांवर  कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट इशारा कार्यकरी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी दिला. या आढावा बैठकीस जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!