ठळक घडामोडी

मतभेद, प्रांतभेद, पक्षभेद विसरून कार्य करणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे अजित दादा पवार – उमेश गाळवणकर

कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली

कुडाळ : प्रतिनिधी
      मतभेद, प्रांतभेद व पक्षभेद विसरून लोकाभिमुख कार्य करणारे, सर्वसामान्यांचे आधारवड असलेले आणि आपल्या अभ्यासूपणाने प्रशासनावर मजबूत पकड असलेले लोकोत्तर व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित दादा पवार होय, असे प्रतिपादन कुडाळ मधील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था (सिंधुदुर्ग)चे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले.
      कुडाळ एमआयडीसीतील  बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग येथे गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना गाळवणकर यांनी अजित दादा पवार यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे वर्णन करताना त्यांचा रोखठोक स्पष्टवक्तेपणा, तितकाच हळवा स्वभाव आणि शब्द पाळणारे कुशल प्रशासक म्हणून त्यांचे विशेष कौतुक केले. समाजहिताचा निर्णय घेताना त्यांनी कधीही टीका किंवा विरोधाचा विचार केला नाही. सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारे आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून ते कार्यकर्त्यांना आपलेसे वाटत होते. त्यामुळेच त्यांना ‘कामाचा माणूस’ या उपाधीने गौरविण्यात येत असे. लोकांना हवाहवासा वाटणारे प्रशासनातील लोकनेते अशा अजित दादा पवार यांचे अपघाती व अकाली निधन मनाला चटका लावणारे आणि अस्वस्थ करणारे आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जेव्हा समाजातील प्रश्नांची उकल करण्यासाठी लोकनेत्याची गरज भासेल, तेव्हा अजित दादा पवार यांची उणीव प्रकर्षाने जाणवेल, असेही त्यांनी सांगितले.
दादांचे नसणे हे दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करून गाळवणकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. समाजहिताचे कार्य करणाऱ्यांप्रती आपण सहवेदना जपली पाहिजे, असे सांगत त्यांच्या कुटुंबीयांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
     यावेळी प्रा. अरुण मर्गज यांनीही अजित दादा पवार यांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी दादांचा खमकेपणा, धडाडी, कडक शिस्त, वक्तशीरपणा, मिश्किल स्वभाव तसेच प्रशासनावर असलेली पकड आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा चढता आलेख उपस्थितांसमोर उलगडून सांगितला व कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली. या कार्यक्रमास बॅरिस्टर नाथ पै बी.एड. कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्पना भंडारी, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, पल्लवी कामत तसेच विविध शिक्षणक्रमांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!