ठळक घडामोडी

सिंधुदुर्गला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी – पालकमंत्री ना. नितेश राणे

‘सिंधु दर्पण’ गृहनिर्माण संस्थेमार्फत पत्रकारांना ओरोस येथे हक्काची घरे

अवैध धंदे मुळापासून उखडून टाकणार ; राजकीय किंमत मोजायलाही तयार : मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
       सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे खा. नारायण राणे यांनी जिल्ह्याचा भक्कम पाया रचला, त्याच धर्तीवर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि दरडोई उत्पन्नात वाढ करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या प्रवासात पत्रकारांनी मार्गदर्शक आणि टीकाकार अशा दोन्ही भूमिकांतून साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
      सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिन आणि पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. मंत्री राणे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी, जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सचिव बाळ खडपकर, खजिनदार संतोष सावंत, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकार प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      यावेळी मंत्री राणे यांनी पत्रकारांच्या प्रलंबित घरांच्या प्रश्नावर मोठी घोषणा करतानाच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या आपल्या मोहिमेवरही भाष्य केले. जिल्ह्यातील तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या अवैध धंद्यांवर प्रहार करताना ना. नितेश राणे म्हणाले, राणे साहेबांनी मला पालकमंत्री पद स्वीकारताना पहिले काम जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे दिले होते. काही जण म्हणतात यामुळे मला निवडणुकीत फटका बसला, पण मी त्याची पर्वा करत नाही. जर माझ्या जिल्ह्यातील तरुण पिढी बिघडत असेल आणि संसार उद्ध्वस्त होत असतील, तर मी गप्प बसणार नाही. पालकमंत्री असेपर्यंत हे धंदे मी मुळापासून उखडून टाकेन आणि यासाठी मला माध्यमांची साथ हवी आहे, असे मंत्री राणे म्हणाले.
     जिल्ह्यातील विकासाच्या भविष्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालय जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी जमिनीचा अभ्यास करत आहे. २०२९ पर्यंत जिल्ह्यातील ५० टक्के तरुण, जे नोकरीसाठी बाहेर आहेत, ते पुन्हा जिल्ह्यात परततील इतक्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. चिपी विमानतळ २४ तास सुरू झाले असून, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठीही पुढाकार घेतला आहे. गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ५ लाखांपर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे. असे सांगत त्यांनी लोकशाहीतील माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा मुख्यालयाप्रमाणेच तालुका पातळीवरही पत्रकार भवने उभारण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत, त्याला सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल.
     जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ओरोस येथे माफक दरात मिळणार हक्काची घरे!
     पत्रकारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना पालकमंत्री राणे म्हणाले की, “सिंधु दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून ओरोस येथे पत्रकारांना हक्काची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत या भूखंडाचे हस्तांतरण होईल. ज्येष्ठ पत्रकार माधव कदम,संतोष वायंगणकर, उमेश तोरसकर,शशी सावंत,गजानन नाईक,बाळ खडपकर, संतोष राऊळ असे अनेक लोक आग्रही होते त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच या गृहनिर्माण प्रकल्पाला सुरुवात होईल आणि हक्काच्या घराच्या चाव्या पत्रकारांच्या हातात असतील. जिल्हा पत्रकार भवन ज्याप्रमाणे एक आदर्श ठरले, तसेच हा गृहनिर्माण प्रकल्पही आदर्श ठरेल.”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
         पुरस्कारांचे वितरण
    यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवगडचे अयोध्याप्रसाद गावकर, कणकवलीचे सुधीर राणे, मालवणचे अर्जुन बापर्डेकर, कुडाळचे प्रशांत पोईपकर, सावंतवाडीचे सागर चव्हाण, वेंगुर्लाचे प्रदीप सावंत, सिंधुदुर्गनगरीचे लवू म्हाडेश्वर, दोडामार्गचे ओम देसाई, वैभववाडीचे महेश रावराणे या नऊ जणांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मंत्री नितेश राणे व विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक खडपकर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश जेठे यांनी केले.

error: Content is protected !!