संदीप परब यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती समिती स्थापन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील अणाव गावातील समविचारी मंडळींनी एकत्र येत गावात दारू बंदीबाबत मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत गावात दारूचे दुष्परिणाम जनजागृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीद्वारे दारूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर मोहीम राबवली जात असून या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा आदर्शवत उपक्रम अणाव ग्रामस्थांनी समितीचे अध्यक्ष संदीप परब यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतला आहे.
गावात स्थापन करण्यात आलेल्या दारूचे दुष्परिणाम जनजागृती समिती (अणाव) चा वर्षपूर्ती कार्यअहवाल प्रकाशन सोहळा व जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच तेथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकणरत्न ॲड. राजीव बिले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश धुरी उपस्थित होते. यावेळी सरपंच लिलाधर अणावकर, समितीचे अध्यक्ष संदीप परब, पोलिस पाटील सुनिल पाटकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विनायक अणावकर, सामाजिक कार्यकर्ते दिवाकर परब, प्रा. अजित कानशिडे, समिती सचिव उमेश पटवर्धन, निवृत्त अधिकारी बाळकृष्ण परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अणाव गावातील दारूबंदी समितीचे अध्यक्ष तसेच जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांनी सभेचा उद्देश स्पष्ट करून उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.
अध्यक्षीय भाषणात ॲड. राजीव बिले यांनी शासनाच्या दारूबंदी विभागाच्या अधिकारांवर भाष्य करताना दारू विक्री व दारू पिण्याच्या परवान्यांतील विसंगतीवर मिश्कील शैलीत भाष्य केले. आपल्याकडे दारू ठेवण्याचा परवाना असूनही आपण आजपर्यंत एकही थेंब दारू प्राशन केलेली नाही, हा अनुभव त्यांनी विनोदी पद्धतीने सांगितला. तसेच दारूसोबतच अमली पदार्थांचे सेवन तरुण वर्गात वाढत चालल्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. हे आपल्या तरुण पिढीला कमकुवत करण्यासाठीचे परकीय षडयंत्र असल्याचे सांगत, भारतावर प्रेम व्यक्त करणाऱ्या तरुणांनी अशा चालींना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. कुडाळ येथे कार्यरत असलेल्या अँटी-ड्रग्स ग्रुपप्रमाणेच अणाव परिसरात कुठेही अनुचित प्रकार जाणवल्यास समितीच्या निदर्शनास आणावे व ड्रग्सविरोधी मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही अॅड.बिले यांनी केले.
मार्गदर्शन करताना डॉ. रुपेश धुरी यांनी दारूबंदी संदर्भात एक अभिनव व विचारप्रवर्तक कल्पना मांडली. त्यांनी सुचविले की दारू खरेदी करताना स्कॅनरद्वारे होणाऱ्या पेमेंटसाठी घरातील जबाबदार व्यक्तीच्या मोबाईलवर ओटीपी जावा व त्या व्यक्तीची संमती मिळाल्यानंतरच व्यवहार पूर्ण व्हावा. उदाहरणार्थ, वडील किंवा पत्नी यांची संमती मिळाल्यावरच संबंधित व्यक्तीस दारू मिळावी. असे झाल्यास कुटुंबाचा सहभाग वाढेल व दारूबंदीच्या दिशेने हे एक प्रभावी पाऊल ठरेल, असे त्यांनी मत व्यक्त केले. तसेच “आपण काय काम करतो हे समजून घ्यायचे असेल, तर कधीतरी रुग्ण म्हणून रुग्णालयाला भेट द्या,” असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. पोलीस पाटील सुनिल पाटकर यांनी अशा संघटनची सुरुवात करणे गरजेचे होते आणि ही सुरुवात आपल्या गावातून होते हे अभिमानास्पद आहे. पालकांनी यामध्ये जास्त लक्ष देऊन आपल्या मुलांना या व्यसना पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
या समितीत अध्यक्ष संदीप परब, उपाध्यक्ष अनिल पालव, सचिव उमेश पटवर्धन, सहसचिव सहदेव पाटकर, खजिनदार दिपक नांदीवडेकर, सहखजिनदार राजन परब, सल्लागार सरपंच लीलाधर अणावकर तसेच सदस्य सिताराम परब, नरेश परब, अनिकेत पाटकर, मंदार माडये, गौरव आंगणे, तुषार पाटील, धाकू जाधव, अमोल परब, आनंद सुपल, प्रसाद आंगणे, निखिल सोनार, अजित अणावकर, तुषार आंगणे, अविनाश अणावकर, विष्णू अणावकर, दीपक अणावकर, नरेंद्र परब, नरेश आंगणे, प्रतीक परब आदींचा समावेश आहे. या सर्वांनी वर्षभर उल्लेखनीय कार्य केले असून ते निश्चितच कौतुकास्पद व आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार यावेळी उपस्थित मान्यवरांनी काढले.
या कार्यक्रमात ज्या व्यक्तींनी प्रबोधनामुळे दारू सोडली, त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच घरगुती समारंभांमध्ये, विशेषतः हळदीच्या कार्यक्रमात होणाऱ्या दारू वाटपाच्या प्रथेला कृतीतून विरोध करणाऱ्या तडफदार कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. “छोट्या-छोट्या कृतीतूनच मोठा सामाजिक बदल घडतो,” या विचारातून दारूचे दुष्परिणाम जनजागृती समिती, अणावच्या गेल्या एक वर्षातील कार्याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमादरम्यान दारूचे दुष्परिणाम याबाबतची माहिती स्क्रीनवर दाखवण्यात येत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले. तर आभार नरेश परब यांनी मानले.
चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे – संदीप परब
अणाव गावांतील समविचारी मंडळी एकत्र येऊन “दारूचे दष्परिणाम जनजागृती समिती (अणाव)” ची स्थापन करुन विविध उपक्रम राबवले जात आहेत. दारूचे व्यसन घातक आहे. ‘दारु’ ची एकदा मेंदूला सवय लागली की ती हवीहवीशी वाटते. आज अनेक कार्यक्रमांच्या पार्ट्यात दारू पिऊन धिंगाना घातला जातो. वयाने मोठी असलेली माणसे दारू पिऊ लागली की लहान मुलं आकृष्ट होतात. तरूण पिढी या व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे. आपल्या भावी पिढीला यापासून दुर ठेवण्यासाठी दारूचे दुष्परिणाम जनजागृती समिती कार्यरत आहे. भौगोलिक दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती असलेल्या आपला अणाव गाव आहे. निसर्गाने नटलेल्या, आध्यात्मिक परंपरा असलेल्या माझ्या गावातील तरुण दारू किंवा इतर अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये म्हणून गावातील समविचारी माणसं एकत्र येऊन काम करीत आहेत. या चळवळी मध्ये गावातील प्रत्येकाने सहभागी व्हावे. – संदीप परब, अध्यक्ष – दारूचे दुष्परिणाम जनजागृती समिती
कोवळ्या वयाची दारु (ण) अवस्था…!
तरूण पिढीत दारूचे प्रमाण वाढते आहे. ‘बीअर म्हणजे दारू नाही, तू घेऊ शकतोस’ असं सांगत आग्रह करणारे या मुलांचे मित्र जसे आहेत तसे अगदी पालकही आहेत. मात्र बीअरपासून सुरू झालेला प्रवास विविध ब्रॅण्डच्या दारूसह कधी कधी तर देशी दारूपर्यंत पोहोचतो हे त्या मुलांनाही कळत नाही. मानसशास्त्रीय अभ्यासानुसार अल्पवयात दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता १५ टक्के असते. त्यामुळे किशोरवयीन मुलांमधील मद्यपानाचे वाढते प्रमाण हे भावी तरुण पिढीसाठी धोक्याची घंटा आहे. यासाठी दारूचे दुष्परिणाम नियंत्रक समिती अणावच्या सर्व पदाधिकारी व हितचिंतक यांनी भावी पिढीची दारू (ण) परिस्थिती याबाबत राबविलेले उपक्रम व जनजागृती मोहीमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. मी अणाव गावचा सरपंच या नात्याने सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की, या समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला सर्वांनी पाठिंबा व सहकार्य द्यावे.
– लिलाधर अणावकर, सरपंच – अणाव ग्रामपंचायत









