

कणकवलीतील हाॅस्पीटल तोडफोड प्रकरणी बंद
कणकवली : प्रतिनिधी
कासार्डे येथील कस्तुरी पाताडे या युवतीच्या मृत्यू नंतर वस्तुस्थिती समजून न घेता काही समाज विघातक वृत्तींनी कायदा हातात घेत कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटल वर हल्ला करत हॉस्पिटलची तोडफोड केली तसेच नागवेकर कुटुंबीयांतील महिला डॉक्टर्सवर व नर्सिंग स्टाफवर हल्ला केला, त्याचा सिंधुदुर्गमधील सर्व डॉक्टर्स संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करत मंगळवार जिल्ह्यातील सर्व दवाखाने, हॉस्पिटल्स बंद ठेवत आंदोलन छेडण्यात आले. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सर्व रुग्णांची गर्दी दिसून आली. या आंदोलनामुळे सर्वसामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयांचा आधार मिळाला आहे.
सिंधुदुर्गात डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग, फ्रायडे क्लब, कणकवली, व इंडियन मेडिकल असोसिएशन, सिंधुदुर्ग या खाजगी वैद्यकीय सेवा देणाºया डॉक्टरांच्या संघटनांकडून तातडीची सेवा वगळता हॉस्पिटल ,दवाखाने बंद ठेवत आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळाला. मात्र , अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे रुग्णांची गैरसोय झाल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथे रुग्णांची गर्दी दिसून आली .या आंदोलनाच्या परिस्थितीत तापसरी , सर्दी, खोकला यासह विविध आजारांच्या रुग्णांना सरकारी रुग्णालयांचा आधार मिळाला .
दरम्यान, मृत कस्तुरी पाताडे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी डॉ. नागवेकर रुग्णालयाची तोडफोड रविवारी केली होती. याप्रकरणी ५० ते ६० जमावावर कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तर मृत कस्तुरी पाताडे हिच्या मृत्यूप्रकरणी वडिलांच्या तक्रारीनुसार २ डॉक्टरांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे कणकवली शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.








