ठळक घडामोडी

कणकवली नगराध्यक्ष पदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी

भाजपच्या समीर नलावडेंचा पराभव : आमदार निलेश राणे ठरले किंगमेकर

कणकवली : प्रतिनिधी

     संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून पालकमंत्री नितेश राणे यांना झटका बसला आहे. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांचा क्रांतिकारी विचार पक्ष म्हणजेच कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी १४५ मतांनी पराभव करत जोरदार दणका दिला आहे. संदेश पारकर यांना ५२४१ तर समीर नलावडे यांना ५०९६, गणेशप्रसाद पारकर १७५ यांना मते मिळाली तर ७२ मतदारांनी नोटाचा अधिकार बजावला. मात्र, नगरसेवकपदाच्या १७ जागांपैकी भाजपाने ९ जागा तर शहर विकास आघाडीला ८ जागा प्राप्त झाल्या आहे. कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांची एन्ट्री कणकवली नगरपंचायत निवडणुकीत निर्णायक ठरली असून शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्टÑवादी (श.पा), कॉंग्रेस यांना या निवडणुकीत बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्टÑवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष व माजी उनगराध्यक्ष या दोघांना पराभूत व्हावे लागले. भाजपाने विकासाच्या मुद्दा फेल ठरला असून शहर विकास आघाडीचा भय व भ्रष्टचारमुक्तचा नारा यशस्वी ठरला.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी ७९.७१ टक्के मतदान झाले होते. १०५८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज रविवार २१ डिसेंबर रोजी निवडणुकाचा निकाल जाहीर झाला. निकालासाठी कणकवली तहसील कार्यालय येथील निवडणूक मतमोजणी कक्षात ही मोजणी झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील यांच्यासह प्रांताधिकारी जगदिश कातकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीसाठी १ ते ५ प्रभागांची मोजणी करण्यात आली.
भाजपचे राकेश राणे विजयी
पहिल्या फेरीसाठी १ ते ५ प्रभागांची मोजणी करण्यात आली. यामध्ये प्रभाग १ मध्ये ७६१ मतदान झाले होते. त्यापैकी नगराध्यपदासाठी समीर नलावडे (३६८), संदेश पारकर (३६४), गणेशप्रसाद पारकर (१६) मते मिळाली. या प्रभागात नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे यांना ४ मतांची आघाडी मिळाली. तर नगरसेवकपदासाठी भाजपचे राकेश राणे यांना (४४४) तर शहर विकास आघाडीचे (३१०) मते मिळाली. १३४ मतांनी भाजपचे राकेश राणे विजयी झाले.
प्रतीक्षा सावंत यांनी प्रभाग राखला
प्रभाग दोनमध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (३७२), संदेश पारकर (२८२), गणेशप्रसाद पारकर (१०) मते मिळाली. नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे यांना ९० मतांची आघाडी मिळाली. तर नगरसेवकपदासाठी भाजपच्या प्रतीक्षा सावंत यांना (३४३) तर शहर विकास आघाडीच्या साक्षी आमडोस्कर (३१५) मते मिळाली. या प्रभागातून प्रतीक्षा सावंत या २८ मतांनी विजयी झाल्या.
भाजपला मिळाले यश
प्रभाग तीनमध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (२१९), संदेशपारकर (२२९), गणेशप्रसाद पारकर (९) मते मिळाली. या प्रभागातून संदेश पारकर १० मतांची आघाडी मिळाली. तर नगरसेवकपदासाठी भाजपचे स्वप्नील राणे (२५७), शहर विकास आघाडीचे सुमित राणे (१९३), आपचे संजय पवार (६) मते मिळाली. या प्रभागातून भाजपचे स्वप्नील उर्फ दादू राणे हे ६४ मतांनी विजयी झाले.
शहर विकास आघाडीने खाते खोलले
प्रभाग चारमध्ये लक्षवेधी लढत झाली. यात नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (२३५), संदेश पारकर (२७८), गणेशप्रसाद पारकर (१०) मते मिळाली. या प्रभागात संदेश पारकर ४३ मतांची आघाडी मिळाली. तर नगरसेवकपदासाठी भाजपचे माधवी मुरकर (२२९), शहर विकास आघाडीच्या जाई मुरकर (२८८) यांना मते मिळाली. या प्रभागातून शहर विकास आघाडीच्या जाई मुरकर ५९ मतांनी विजयी होत शहर विकास आघाडीच्या विजयाचे खाते खोलले.
मेघा गांगण विजयी चौकार
प्रभाग पाचमध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (२६७), संदेश पारकर (३११), गणेशप्रसाद पारकर (१४) मते मिळाली. संदेश पारकर यांना ४४ मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपच्या मेघा गांगण (३२२) , शहर विकास आघाडीच्या स्नेहा वाळके (२७०) मते मिळाली. अपेक्षेप्रमाणे मेघा गांगण यांनी ५२ मतांनी विजयी होत विजयाचा चौकार लगावला आहे. पहिल्या पाच प्रभागात समीर नलावडे यांना १४६१ तर संदेश पारकर यांना १४६४ मते मिळाली. या पाच प्रभागांमध्ये ३ मतांनी आघाडीवर होते.
सुमेधा अंधारी यांनी गड राखला
प्रभाग सहामध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (२९२) संदेश पारकर (३४९), गणेशप्रसाद पारकर (४) मते मिळाली. या प्रभागात संदेश पारकर ५७ मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपच्या स्नेहा अंधारी (२८१), शहर विकास आघाडीच्या सुमेधा अंधारी (३६४) मते मिळाली. या प्रभागात शहर विकास आघाडीच्या सुमेधा अंधारी या ८३ मतांनी विजयी झाल्या.
सुप्रिया नलावडे यांना सर्वाधिक मताधिक्य
समीर नलावडे यांचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग सातमध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (५९६), संदेश पारकर (३१४), गणेशप्रसाद पारकर (११) मते मिळाली. समीर नलावडे यांना या प्रभागात २८२ चे मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपच्या सुप्रिया नलावडे (६६९), शहर विकास आघाडी च्या सावी अंधारी (२४५) मते मिळाली. या प्रभागातून सुप्रिया नलावडे यांनी तब्बल ४२४ मतांनी विजय संपादन केला.
लुकेश कांबळे चमकले
प्रभाग आठमध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (३३३), संदेश पारकर (३५१), गणेशप्रसाद पारकर (११) मते मिळाली. या प्रभागात संदेश पारकर यांना १८ मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपचे गौतम खुडकर (३२४), शहर विकास आघाडीचे लुकेश कांबळे (३६८) मते मिळाली. याप्रभागात लुकेश कांबळे यांनी ४४ मतांनी विजय मिळवला.
मेघा सावंत यांचा दमदार विजय
प्रभाग नऊमध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (३१९), संदेश पारकर (३४४), गणेशप्रसाद पारकर (१६) मते मिळाली. या प्रभागात संदेश पारकर यांना २५ मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपच्या मेघा सावंत (३४४), अपक्ष मधुरा मालंडकर-वाळके (१६०), शहर विकास आघाडीच्या रिना जोगळे (१७३) मते मिळाली. या तिरंगी लढतीचा फायदा भाजपच्या मेघा सावंत यांना झाला असून त्या १७१ मतांनी मेघा सावंत विजयी झाल्या.
आर्या राणे यांचा विजय
प्रभाग दहामध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (३२०), संदेश पारकर (२४४), गणेशप्रसाद पारकर (५) मते मिळाली. या प्रभागात समीर नलावडे यांना ७६ मतांची आघाडी मिळाली. तर नगरसेवकपदासाठी भाजपच्या आर्या राणे (३२९), शहर विकास आघाडीच्या शीतल मांजरेकर (२२९) मते मिळाली. आर्या राणे यांनी १०० मतांनी विजय मिळावला. सहा ते दहा प्रभागात समीर नलावडे यांना १८६० तर संदेश पारकर यांना १६०२ मते मिळाली. त्यामुळे या प्रभागांमध्ये समीर नलावडे यांना २५५ मतांची आघाडी मिळाली होती.
दीपिका जाधव विजयाच्या मानकरी
प्रभाग अकरामध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (२०५), संदेश पारकर (२७०), गणेशप्रसाद पारकर (११) मते मिळाली. या प्रभागात संदेश पारकर यांना ६५ मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपच्या मयुरी चव्हाण (१९७) तर शहर विकास आघाडीच्या दीपिका जाधव (२८८) मते मिळाली. दीपिका जाधव यांनी ९१ मतांनी विजयी झाल्या.
भाजपच्या मनस्वी ठाणेकर विजयी
प्रभाग १२ मध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (३८४), संदेश पारकर (३९३), गणेशप्रसाद पारकर (१२) मते मिळाली. या प्रभागात संदेश पारकर यांना ९ मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपच्या मनस्वी ठाणेकर (४१४), शहर विकास आघाडीच्या प्रांजली आरोलकर (३७३) मते मिळाली. या प्रभागात भाजपच्या मनस्वी ठाणेकर ४१ मतांनी विजयी झाल्या.
बंडू हर्णे यांचा धक्कादायक पराभव
प्रभाग तेरामध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (२३७), संदेश पारकर (३५४), गणेशप्रसाद पारकर (४) मते मिळाली. या प्रभागात संदेश पारकर यांना ११७ मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपचे गणेश उर्फ बंडू हर्णे (२३४), शहर विकास आघाडीचे जयेश धुमाळे (३६९) मते मिळाली. या प्रभागात माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा जयेश धुमाळे १३५ मतांनी दारूण पराभव केला.
रुपेश नार्वेकर यांचा दमदार विजय
प्रभाग १४ मध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (२२१), संदेश पारकर (२८९), गणेशप्रसाद पारकर (१३) मते मिळाली. या प्रभागात संदेश पारकर ६८ मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपचे सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे (२४३), शहर विकास आघाडीचे राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर (२७८) मते मिळाली. या प्रभागात रुपेश नार्वेकर यांनी ३५ मतांनी अण्णा कोदे यांचा पराभव केला.
संकेत नाईक यांची दमदार एन्ट्री
प्रभाग १५ मध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (१४८), संदेश पारकर (२२८), गणेशप्रसाद पारकर (८) मते मिळाली. या प्रभागात संदेश पारकर यांना ८० मतांची आघाडी मिळाली. तर नगससेवकपदासाठी भाजपच्या विश्वजीत उर्फ अमोल रासम (१५०), तर शहर विकास आघाडीचे संकेत नाईक (२३४) मते मिळाली. संकेत नाईक यांनी ८४ मतांनी अमोल रासम यांचा पराभव केला. प्रभाग ११ ते १५ या पाच प्रभागात समीर नलावडे ११९५ तर संदेश पारकर १५३४ मते मिळाली. या प्रभागांच्या मतमोजणीनंतर संदेश पारकर एकूण ८४ मतांची आघाडी मिळाली.
संजय कामतेकर यांचा गड कायम
प्रभाग १६ मध्ये नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (३०३), संदेश पारकर (३७३), गणेशप्रसाद पारकर (१३) मते मिळाली. संदेश पारकर यांना ७० मतांची आघाडी मिळाली. नगरसेवकपदासाठी भाजपचे संजय कामतेकर (४३८), शहर विकास आघाडीचे उमेश वाळके (२४५)मते मिळाली. संजय कामतेकर यांनी १९३ मतांनी उमेश वाळके यांना दारूण पराभव केला.
अबिद नाईक यांचा पराभव
प्रभाग १७ हा सर्वाधिक लक्षवेधी प्रभाग मानला जात होता. या प्रभागात नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे (२७७), संदेश पारकर (२६८), गणेशप्रसाद पारकर (८) मते मिळाली. या प्रभागात समीर नलावडे यांना ९ मतांची आघाडी मिळाली. मात्र, नगरसेवकपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक (१९५) तर शहर विकास आघाडीचे उमेदवार युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना (३५९) मते मिळाली. सुशांत नाईक यांनी तब्बल १६४ मतांनी अबिद नाईक यांचा पराभव आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले.
चौकट
पक्षीय बलाबल
एकूण जागा १७
भाजप ९
शहर विकास आघाडी ८
चौकट
नगराध्यक्षपदांची मते
संदेश पारकर (शहर विकास आघाडी) ५२४१
समीर नलावडे (भाजप) ५०९६
गणेशप्रसाद पारकर (१७५)
नोटा (७२)
एकूण मते १०५८४

error: Content is protected !!