
मिलिंद नाईक-सिताराम तेली बिनविरोध मार्गावर
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतीपदासाठी भाजपचे सिताराम तेली यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. ठाकरे शिवसेनेने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही पदांसाठी महायुतीतर्फे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला असून नाईक आणि तेली यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. दुपारी तीन वाजल्यापासून होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेनंतर सभापती व उपसभापती पदाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
कुडाळ पंचायत समितीत महायुतीचे स्पष्ट वर्चस्व आहे. येथे भाजपाचे सात, शिंदे शिवसेनेचे सहा आणि ठाकरे शिवसेनेचे पाच असे एकूण अठरा सदस्य आहेत. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सभापतीपदासाठी साळगाव पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक यांचे तर उपसभापतीपदासाठी झाराप पंचायत समिती सदस्य सिताराम तेली यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार दोघांनीही आज अधिकृतरित्या आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमरसिंह जाधव यांच्याकडे दाखल केले. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते.
भाजपापेक्षा एक सदस्य कमी असूनही सभापतीपद शिंदे शिवसेनेला मिळवून देण्यात आ. निलेश राणे यांना यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडीमुळे कुडाळ तालुक्यात आ. निलेश राणे यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाल्याचेही मानले जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, शिवसेना जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य दादा साईल, जि.प. सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, रूपेश कानडे, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, बाळकृष्ण मडव, निखिल कांदळगावकर यांच्यासह महायुतीचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
दुपारी तीननंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर निवडणूक होणार असली तरी दोन्ही पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता उरली असल्याचे स्पष्ट झाले आहे.








