कुडाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गर्जना
कुडाळ : प्रतिनिधी
कोकण, आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे. जिल्ह्यातील एकाही विकासकामाला निधी कमी पडू देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं सध्याचं 20 कोटींचं बजेट थेट 100 कोटी रुपये झालंच पाहिजे, अन्यथा विकास कसा होणार? असा थेट सवाल उपस्थित करत शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्गवासीयांना मोठी ग्वाही दिली.
कुडाळात महायुतीची शक्तिप्रदर्शन सभा
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ हायस्कूल मैदानावर शिवसेना–भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
२५ टक्के विजय आधीच मिळवला; आता १०० टक्के निकाल महायुतीचाच!
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तब्बल २५ उमेदवार बिनविरोध निवडून येणं हा इतिहास आहे. म्हणजे २५ टक्के विजय आपण आधीच मिळवला आहे. उरलेले ७५ टक्केही जिंकून शंभर टक्के निकाल महायुतीचाच लागणार आहे.कोकणातील कोकणी माणसाने मुंबई–ठाण्यात महायुतीला निर्णायक विजय मिळवून दिला. हाच ‘डिझायनिंग फॅक्टर’ आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राणे साहेब म्हणजे कोकण… आणि कोकण म्हणजे राणे साहेब!
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार नारायण राणे यांच्या कोकणासाठीच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत सांगितले की, स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणावर प्रेम केलं आणि कोकणच्या माणसाने बाळासाहेबांवर. मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला, पण तिची नाळ कोकणात रुजलेली आहे.
विकास, रोजगार आणि महिलांसाठी ठोस आश्वासन!
आधीचं सरकार प्रकल्प थांबवणारं होतं, तर आमचं सरकार प्रगतीचं आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सिंचन, रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन आणि रोजगारासाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ही निवडणूक केवळ मतदानाची नाही, तर सिंधुदुर्गच्या आणि आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याचा निर्णय करणारी असल्याचे सांगत शिंदे यांनी 7 तारखेला महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन केले.उद्योगमंत्री श्री. सामंत, पालकमंत्री श्री. राणे, आमदार श्री.केसरकर व श्री.राणे यांनी संबोधित केले.









