ठळक घडामोडी

कुडाळ येथे १ मार्चला जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा!

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे आयोजन

युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम

कुडाळ : प्रतिनिधी
     स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) कुडाळ मागील सात वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून युवकांना सकारात्मक दिशादर्शन करण्याचे काम सातत्याने करत आहे. संस्थापक धीरज परब यांच्या पुढाकारातून विविध क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक, नोकरी करणारे मित्रपरिवार यांना एकत्र जोडण्याचे काम करण्यात आले आहे.
   ‘ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग’ हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवून त्यांना व्यायामाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने यावर्षी संस्थेच्या माध्यमातून १ मार्च रोजी कुडाळ येथे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न तसेच सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन मान्यतेने संपन्न होणार आहे. स्पर्धेतील महाविजेत्यास ‘स्वस्तिक श्री’ हा किताब, रोख रुपये ३० हजार व चषक प्रदान करण्यात येणार असून बेस्ट पोझर व मोस्ट इम्प्रूव्ह्ड या गटांमध्ये प्रत्येकी रुपये ५ हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धा ० ते ५५ किलो, ५५ ते ६० किलो, ६० ते ६५ किलो, ६५ ते ७० किलो व ७० किलोपेक्षा अधिक अशा पाच गटांमध्ये होणार आहे. प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा व सहावा क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम व चषक/पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच मेन्स फिजिक्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास रुपये ५ हजार, द्वितीय क्रमांकास रुपये ४ हजार, तृतीय क्रमांकास रुपये ३ हजार, चतुर्थ क्रमांकास रुपये २ हजार व पाचव्या क्रमांकास रुपये १ हजार व चषक प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा कुडाळ येथील एस. एन. देसाई (कॉलेज) चौक येथे रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा तसेच रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वस्तिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती संपर्क- 9422596375

error: Content is protected !!