ठळक घडामोडी

कोकणासाठी नारळ, काजू, मत्स्य व पर्यटनावर भर देणारा अर्थसंकल्प – प्रभाकर सावंत

अर्थसंकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे विशेष अभियान

कुडाळ : प्रतिनिधी
      केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसह समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. विशेषतः कोकणासाठी नारळ, काजू, मासे, पर्यटन आणि पशुपालन या क्षेत्रांवर अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याने हा बजेट कोकणवासीयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       कुडाळ येथील भाजप संपर्क कार्यालयात रविवारी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर पाहिले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, प्रदेश सदस्या संध्या तेरसे, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, सुधीर झांट्ये, बंड्या सावंत, सुनील बांदेकर, राजू गवंडे, किरण शिंदे, ममता धुरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
      प्रभाकर सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग बारा वर्षे सादर झालेले अर्थसंकल्प देशाच्या विकासाचा स्पष्ट रोडमॅप दर्शवतात. गेल्या बारा वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश आले असून हेच या अर्थसंकल्पाचे मोठे यश आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला, युवा, लघुउद्योग, क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स आणि अध्यात्मिक क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रासाठी किसान सन्मान योजना, खतांवरील अनुदान, कर्ज योजना यामधून उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात भारताला बायो-फार्मा हब बनवण्यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून कॅन्सर, मधुमेह यांसारख्या आजारांवरील औषधे जेनेरिक स्वरूपात स्वस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. वाहतूक कोंडी व अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय जलमार्ग उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असून महाराष्ट्रासाठी मुंबई–पुणे हायस्पीड रेल कॉरिडोरचे आश्वासनही महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्यासाठी आरोग्य सेवांवर भर देण्यात आला असून मुलींसाठी ग्रामीण भागात वसतिगृहे उभारली जाणार आहेत. ‘खेलो इंडिया’ मिशनअंतर्गत क्रीडा क्षेत्रातही सुधारणा केल्या जाणार आहेत. कोकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नारळ व काजू संवर्धनासाठी विशेष योजना राबवली जाणार असून मत्स्यपालनासाठी देशभरात ५०० अमृत जलाशय उभारण्यात येणार आहेत. पशुपालनासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्याने दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल. महिलांसाठी ग्रामीण भागात ‘सी-मार्ट’ उभारण्याचाही निर्णय स्वागतार्ह असल्याचे सावंत यांनी सांगितले.
      पर्यटन आणि अध्यात्मिक क्षेत्रातही मोठ्या तरतुदी करण्यात आल्या असून देशातील ५०० मंदिरांसाठी ५ हजार कोटी रुपये आणि २० जागतिक पर्यटनस्थळांवर १० हजार पर्यटन मार्गदर्शक तयार करण्यात येणार आहेत. याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून १० फेब्रुवारीपर्यंत विशेष जनजागृती अभियान राबवले जाणार असून जिल्हा संयोजक म्हणून रणजित देसाई काम पाहणार असल्याची माहितीही प्रभाकर सावंत यांनी दिली.

error: Content is protected !!