ठळक घडामोडी

कुडाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; पोलीस अधीक्षकांकडून पोलीस ठाण्याचा गौरव

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ तालुक्यातील एका संवेदनशील व गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल तसेच कुडाळ पोलीस ठाण्याला “आयएसओ” मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांच्या टीमचे प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन केले. सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस अधिक्षक कार्यालय येथे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मगदूम व त्यांच्या टीमला सन्मानित करण्यात आले.
     कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात आरोपीने अपहरण केले होते. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या  प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. या तपासामध्ये अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेम प्रकरणातून खून झाल्याचे उघड झाले होते. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी लपवून ठेवलेला मृतदेह कुडाळ पोलीसांनी कौशल्यपूर्वक शोधून भक्कम पुरावे हस्तगत करून या प्रकरणाचा जलद गतीने छडा लावला होता. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राज्यभरात राबविण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेल्या कार्यवाहीचे मुल्यांकन करण्यात आले. यात कुडाळ पोलीस ठाण्याला ए प्लस गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे.
    कुडाळ पोलिसांनी केलेल्या या दुहेरी कामगिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर यांनी बुधवारी अभिनंदन करीत सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले. यात पोलिस निरीक्षक श्री. मगदूम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा केसरकर, संजय कदम, कृष्णा परुळेकर, प्रमोद काळसेकर,  योगेश वेंगुर्लेकर, सखाराम भोई, आनंद पालव, महेश भोई, समीर बांदेकर, हरेश पाटील, महेश जळवी, रुपेश गुरव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेडगे, विष्णू रामदास, प्रणाली रासम यांना सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!