ठळक घडामोडी

उच्च न्यायालयातील सुलभ प्रॅक्टिस बाबत वकिलांसाठी १४ डिसेंबरला व्याख्यानमाला!सिंधुदुर्गच्या भूमिपुत्र दोन न्यायमूर्तींचा होणार सन्मान : अॅड.संग्राम देसाई यांची माहीती : सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील सर्व वकिलांनी सहभागी होण्याचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
         सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट व न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व वकीलांसाठी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ कोल्हापूर येथील उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणे सुलभ व्हावे यासाठी महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानमाला होणार आहे. हा संयुक्त कार्यक्रम रविवार दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पावशी येथील श्री शांतादुर्गा हाॅलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती श्री.दिघे उपस्थित राहणार आहेत, अशी माहीती बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष तथा सिंधुदुर्गचे पालक सदस्य अॅड.संग्राम देसाई यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.
     कुडाळ येथील वकील चेंबर येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत अॅड.संग्राम देसाई बोलत होते. यावेळी जिल्हा वकील संघटना अध्यक्ष अॅड.परिमल नाईक, सचिव अॅड.यतिष खानोलकर, उपाध्यक्ष अॅड.विवेक मांडकुलकर, महिला उपाध्यक्षा अॅड.निलिमा गावडे, खजिनदार अॅड.गोविंद बांदेकर, अॅड.अमोल सामंत, अॅड.राजीव बिले, अॅड.सुनील लोट, अॅड.अविनाश परब, अॅड.राजीव कुडाळकर, अॅड.निलांगी रांगणेकर-सावंत, अॅड.राजश्री नाईक, अॅड.अमित सावंत, अॅड.हितेश कुडाळकर, अॅड.निखिल गावडे, अॅड.विक्रांत परब, अॅड.दत्ताराम बिले, अॅड.विनय मांडकुलकर, अॅड. शशांक जाधव, अॅड.सुयश गवंडे, अॅड.मार्गी, अॅड.मडव आदींसह वकील उपस्थित होते.
      अॅड.देसाई म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी निवड झालेले न्यायमूर्ती शिरसाट हे मूळ कणकवलीचे व न्यायमूर्ती जामसंडेकर हे मूळचे देवगडचे आहेत. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्यानंतर या जिल्ह्याच्या या दोघ भूमिपुत्रांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी निवड झाली आहे. आपल्या जिल्ह्यातील दोन वकिलांची न्यायमूर्ती पदी निवड झाल्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकीलांसोबतच सामान्य माणसांना मोठा अभिमान आहे. यानिमित्त जिल्हा वकील संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरला खंडपीठ स्थापन झाल्यानंतर या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील, यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सहा जिल्ह्यातील वकिलांनी तिकडे येऊन प्रॅक्टिस करावी, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. ही प्रॅक्टिस करत असताना खास करून तरूण मुलांना ज्या अडचणी येतात, किंवा त्यांनी प्रॅक्टिस कशा पद्धतीने केली पाहीजे, याबद्दलचे मार्गदर्शन न्यायमूर्ती श्री.कर्णिक व न्यायमूर्ती श्री.दिघे तसेच न्यायमूर्ती श्री.जामसंडेकर हे यावेळी वकिलांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.देशपांडे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड.परिमल नाईक, उपाध्यक्ष अॅड.विवेक मांडकुलकर यांच्यासह आमचे सर्व पदाधिकारी अतिशय मेहनत घेत आहेत, असे अॅड.देसाई यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!