जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा अनोखा जागर
साडी परिधान करून महिलांचा वॉकेथॉनमध्ये सहभाग
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी ‘कुडाळ साडी वॉकेथॉन – २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ महिलांसाठी असून स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
रविवारी सकाळी ७ वाजता (रिपोर्टिंग वेळ ६.३० वाजता) येथील महालक्ष्मी सभागृह येथून या वॉकेथॉनला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत महिलांना साडी परिधान करून सहभागी होता येणार असून ती दीड किलोमीटर व तीन किलोमीटर अशा दोन गटांमध्ये होणार आहे. दीड किलोमीटर वॉकेथॉनचा मार्ग महालक्ष्मी सभागृह – भैरव मंदिर – बस स्थानक – बाजारपेठ वर्दम तिठा – पानबाजार – महालक्ष्मी सभागृह असा राहणार आहे. तर तीन किलोमीटर वॉकेथॉनचा मार्ग महालक्ष्मी सभागृह – भैरव मंदिर – बस स्थानक – नक्षत्र टॉवर – जिजामाता चौक – पोस्ट कार्यालय – पोलीस ठाणे – छत्रपती संभाजी महाराज चौक – पुन्हा पोलीस ठाणे – जिजामाता चौक – नक्षत्र टॉवर – बस स्थानक – बाजारपेठ वर्दम तिठा – पानबाजार – महालक्ष्मी सभागृह असा राहील. या वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना पदक, भेटवस्तू, सरप्राईज कुपन तसेच अल्पोपहाराची सोय आयोजकांकडून करण्यात येणार आहे. कोणत्याही वयोगटातील महिला या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.
तसेच लक्षवेधी साडी परिधान करणाऱ्या महिलांमधून प्रथम तीन क्रमांकाच्या महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून आतापर्यंत सुमारे २०० महिलांनी सहभाग नोंदविला आहे. या वॉकेथॉनसाठी प्रवेश शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले असून अधिक माहितीसाठी ८२०८७१२६९२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.









