ठळक घडामोडी

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!

कणकवली : प्रतिनिधी
     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सतीश सावंत यांनी ठाकरे शिवसेना पक्षाला आज जय महाराष्ट्र केला. ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदांचा आपण राजीनामा देत आहोत. आपण आणि आपल्या सोबतचे कार्यकर्ते लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार आहोत असे श्री.सावंत यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
     श्री.सावंत म्हणाले, सिंधुदुर्गातील सिंचन शेती आदी प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ताधारी पक्षात जाणे भाग आहे. त्याबाबत गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांकडून आग्रह धरला जात होता. आम्ही फळपिक विमा रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे, यासाठी चार वेळा आंदोलने केली पण आम्ही सत्तेत असतो तर अशी आंदोलने करण्याची वेळ आली नसती, त्यामुळे सत्ताधारी पक्षात जाण्याबाबत कार्यकर्त्यांकडून सातत्याने आग्रह केला जात होता. त्यामुळे आज ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आज सायंकाळी आणि उद्या सकाळपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुठल्या पक्षात प्रवेश करायचा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कुठल्याही पदासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी हा पक्ष प्रवेश आहे. भविष्यात आम्ही सहकार क्षेत्रात काम करणारा प्राधान्य देणार आहोत असेही श्री सावंत म्हणाले.

error: Content is protected !!