माजी आमदार वैभव नाईक यांनी वचननामा केला जाहीर
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जि. प व पं. स. निवडणुक 7 फेब्रुवारी रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वचनामा काढण्यात आलेला आहे. या वचनाम्याच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जात आहोत. कुडाळ-मालवण मतदार संघात जि. प. च्या 15 व पं. स.च्या सर्व मिळून 44 जागा शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे लढवीत आहोत. या जिल्ह्यातून आमच्या पक्षाचे जे लोक निवडणुकीत उतरलेत ते निष्ठावंत आहेत. या निष्ठावंत लोकांना सर्वसामान्य जनतेने साथ द्या, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कुडाळ येथील शाखेत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार वैभव नाईक यांनी जि. प. व पं. स निवडणुकीसंदर्भात वचननामा जाहीर केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शहर प्रमुख संतोष शिरसाट, कुडाळ शहर युवासेना प्रमुख संदीप म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, जिल्हा परिषदेत भरती प्रक्रियेसह अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. म्हणूनच हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून निष्ठावंत, सुशिक्षित, निष्कलंक, चारित्र्यवान, समाजसेवेत अग्रेसर असणारे होतकरू उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरविले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सूज्ञ जनता निश्चितच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. या निवडणुकीत आमच्या उमेदवारांकडे अर्ज मागे घेण्यासाठी २५ ते ५० लाख रुपये घेऊन लोक गेले होते. परंतु आमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. आमचे उमेदवार निष्ठावंत आहेत. आम्ही आमचा वचनामा जनतेसमोर ठेवत असून कुडाळ – मालवणची जनता आमच्या पाठीशी असेल आणि आम्ही या निवडणुकीत निश्चितच भगवा फडकवू, असा ठाम विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
वैभव नाईक म्हणाले,गेली अडीच वर्षे आणि आता जवळ-जवळ दीड वर्षे अशी एकूण चार वर्षे सत्ता, सध्याचे आमदार, पालकमंत्री असतील यांच्या पक्षाकडे आहे. परंतु चार वर्षात कोणती कामे झालीत? जलजीवन मिशनची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येतात. जिल्ह्यात दुर्दैवाने एकही काम पूर्ण झालेले नाही. अनेक कामांचा निधी अपुरा आहे. चार वर्षात जी कामे सुरु झाली होती त्या कामांचा आराखडा आपण मंजूर केला होता. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांनी एकही काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सिंधुरत्न योजनाही बंद पडल्याचा आरोप त्यांनी केला.









