हातात येणारे पीक नष्ट; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची मागणी
वैभववाडी : प्रतिनिधी
वैभववाडी–फोंडा रस्त्यालगत आचिर्णे माळावर शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे ५० एकर ऊस शेती जळून खाक झाली. या घटनेत अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हातात आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यात ऊस तोड सुरू असतानाच ही आग लागल्याने मोठा फटका बसला. आग इतकी भीषण होती की ती आटोक्यात आणणे अशक्य झाले. या आगीत रुपेश रावराणे, दिनकर लोटेकर, बळवंत बर्गे, वसंत कदम, शशिकांत रावराणे, यशवंत सपकाळ व मोहन मांजलकर या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला.
दरम्यान, घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच रुपेश रावराणे यांनी केली आहे.









