ठळक घडामोडी

कसाल येथे उद्या (१४ मार्च) महसूल समाधान शिबिर!

महसूलच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी मिळणार

नागरिक व विद्यार्थ्यांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
     महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर अभियान (टप्पा – १)’ अंतर्गत कसाल मंडळ स्तरावर शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता कसाल ग्रामपंचायत हॉल येथे विशेष महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी दिली.
    कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांना महसूल विभागातील महत्त्वाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी देण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी तसेच त्याबाबत मार्गदर्शन, ‘सनद’ प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ (संजय गांधी योजना), विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप, तुकडेबंदी कायदा उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप व ई-मोजणी अर्ज, अ‍ॅग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग-२ चे वर्ग-१ करण्याबाबतची प्रकरणे, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्डवरील नाव कमी-जास्त करणे तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कामे करण्यात येणार आहेत. याचबरोबर संबंधित सेवा विषयक अर्जही स्वीकारण्यात येणार आहेत. कुडाळ तालुक्यातील कसाल मंडळातील नागरिक व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरात उपस्थित राहून महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी तहसीलदार अमरसिंह जाधव व मंडळ अधिकारी अशोक चव्हाण यांनी केले आहे.

error: Content is protected !!