ठळक घडामोडी

डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांकडून अटक!

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश मधून संशयिताला केले जेरबंद

कणकवली : प्रतिनिधी
     डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका संशयित आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत पुढील तपास सूरू असल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
       कणकवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा  दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फिर्यादीची तब्बल १२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास कणकवली पोलीस ठाण्यात सुरू असताना पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
   सायबर पोलिसांनी सखोल तांत्रिक तपास करत आरोपीचा शोध घेतला. त्या अनुषंगाने गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे छापा टाकून या प्रकरणी संशयित सिद्धार्थ कुमार जवाहरलाल गुप्ता (वय ३३) याला ताब्यात घेण्यात आले.
    संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास अधिक गतीने सुरू ठेवण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात प्रयत्नपूर्वक फसवणूक झालेल्या १२ लाख रुपयांपैकी १०० टक्के रक्कम गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी (कणकवली) घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रविण कोल्हे व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी उपनिरीक्षक गणेश क-हाडकर, पोहेकाॅ. योगेश सातोसे, सागर भोसले, पोलिस काॅन्स्टेबल स्वप्निल तोरसकर यांनी केली. या तपास पथकाला सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, महिला पोलिस काॅन्स्टेबल धनश्री परब, निकिता परब, स्नेहल जावकर, पोलिस काॅन्स्टेबल फ्रिडन बुथेलो, प्रथमेश गावडे, ऋषिकेश गुरव व युवराज भंडारी या सायबर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सिंधुदुर्ग सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असल्याची माहीती या पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!