निलेश तेंडुलकर यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांतून समाधान
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ–केळुस मार्गावरील तेंडोली – चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या साकवामुळे मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय आणि आवेरे या भागातील ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. मात्र साकवाजवळ एसटी बसचा अधिकृत थांबा नसल्याने नदीपलीकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा पूर्ण लाभ मिळत नव्हता. अखेर शंभूगिरी मठ येथे एसटी थांब्यास मान्यता मिळाल्याने ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे.
या थांब्यासाठी तेंडोली ग्रामस्थांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. दरम्यान निवडणुका व आचारसंहिता यामुळे तसेच प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे मान्यता मिळण्यास अडथळे येत होते. आचारसंहिता संपताच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांनी विभाग नियंत्रक यांच्याशी चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत हा थांबा मंजूर करावा, अशी मागणी लावून धरली. याचबरोबर सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी अशोक राणे तसेच कुडाळ आगारातील तेंडोलीचे रहिवासी रोशन तेंडोलकर यांनी कणकवली विभाग नियंत्रक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर आज शंभूगिरी मठ थांब्यास अधिकृत मान्यता देण्यात आली.
सध्या वाहकांकडे संगणकीय तिकीट प्रणाली कार्यान्वित असल्याने या नव्या थांब्याची नोंद यंत्रणेत करणे आवश्यक आहे. मान्यतेचे पत्र कुडाळ आगार प्रमुखांना प्राप्त होत असून त्यानंतर संगणकीय दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करून बुधवारपासून हा थांबा कार्यान्वित होणार आहे, अशी माहीती निलेश तेंडुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
या ठिकाणी पूर्वी अनेक वेळा चालक व वाहक गाड्या थांबवत नसल्याने विशेषतः महिला प्रवाशांचे मोठे हाल होत होते. नव्या अधिकृत थांब्यामुळे मुननकर वाडी, मांजरेकर वाडी, बागलाची राय आणि आवेरे येथील सर्व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार आहे, असेही श्री.तेंडुलकर यांनी सांगितले.







