महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या केंद्रीय सचिवपदी आनंद लाड यांची निवड!
पुण्यात पार पडलेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात घोषणा
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या केंद्रीय कार्यकारिणी सचिवपदी सिंधुदुर्ग – कुडाळ मधील श्री. आनंद महादेव लाड यांची निवड करण्यात आली.
राज्य वीज कंत्राटी कामगार संघटनेचे सहावे त्रैवार्षिक अधिवेशन दि. १ मार्च २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्यभरातील पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आपली हि निवड करण्यात आल्याची माहीती श्री.लाड यांनी दिली.
श्री. आनंद लाड यांनी २०१९ ते २०२५ या कालावधीत राज्य वीज कंत्राटी कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विविध मागण्यांसाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलने, निवेदने व बैठका घेत कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
जिल्हा पातळीवर कार्य करणाऱ्या आनंद लाड यांच्यावर आता केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निवडीनंतर बोलताना श्री. आनंद लाड यांनी, “आतापर्यंत जिल्हास्तरावर काम करताना कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. पुढेही राज्यभरातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार,” अशी ग्वाही दिली.









