शेतकरी कृष्णा दळवी यांचे आर्थिक नुकसान
वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला; बिबट्याच्या तातडीच्या बंदोबस्ताची मागणी
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथे एका तीन वर्षीय वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याची गंभीर घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडले. यात शेतकरी कृष्णा चंद्रकांत दळवी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पाळये येथील शेतकरी कृष्णा दळवी यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी त्यांची गुरे चरण्यासाठी सोडली. यावेळी गुरांसोबत एक व्यक्तीही होती. दुपारच्या सुमारास जंगलात दबा धरून बस बसलेल्या बिबट्याने अचानक गुरांच्या कळपावर हल्ला चढविला. यात तीन वर्षांच्या वासराला त्याने पकडले व त्याचा फडशा पाडला. बिबट्याचा हल्ला होताच गुराख्याने आरडाओरड केली व काही वेळाने बिबटा तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, अशीच घटना तीन दिवसांपूर्वी मुळस हेवाळे येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. गोठ्यात बांधलेल्या रेड्याला वाघाने हल्ला केल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला होता. तसेच गेल्या महिनाभरातही वाघाच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढत असल्याचे चित्र आहे. सतत होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी हैराण झाले असून जनावरे व ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.









