१०१ वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील झाराप केंद्र शाळा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी मतदान करताना अनेक वयोवृद्ध मतदारही प्रेरणादायी ठरले. १०१ वर्षीय लीलावती लक्ष्मण हरमलकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हाभरात आज शनिवारी मतदान प्रक्रिया जोरात सुरू आहे. सकाळ पासूनच नागरिक मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत होते. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच नागरिक आपल्या मताचा हक्क बाजवण्यासाठी घराबाहेर पडलेले दिसत होते. कुडाळ तालुक्यातील झाराप येथील झाराप केंद्र शाळा मतदान केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. मतदार आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून मतदान करीत होते. या ठिकाणी मतदान करताना अनेक वयोवृद्ध मतदारही प्रेरणादायी ठरले. हरमलकर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आत्मविश्वास व्यक्त करत म्हटले की, मी दरवर्षी हक्काने मतदान करत आहे या वर्षी देखील चालत येऊन मतदान केले. “लोकशाही ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि मतदान हा त्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आपण आपल्या मताचा योग्य वापर केला पाहिजे.” असे त्या म्हणाल्या.









