मुंबई–गोवा महामार्गावर आयशर टेम्पो पकडला; १७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
गोव्यातून राजापूरकडे जाताना दारूची तस्करी उघड; १५० बॉक्स दारू जप्त; दारू तस्करी प्रकरणी दोघे ताब्यात
कुडाळ : प्रतिनिधी
गोवा येथून रत्नागिरी राजापूरच्या दिशेने अवैधरित्या होणा-या गोवा बनावटी दारूची वाहतुकीवर कुडाळ पोलीसांनी आज बेधडक कारवाई केली. मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ जवळ हि कारवाई करीत गोवा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या टेम्पोसह एका संशयितांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे १७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये दारूचा साठा व आयशर टेम्पोचा समावेश आहे, अशी माहीती कुडाळ पोलीसांकडून देण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गोवा राज्यातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, दि. ९ मार्च २०२६ रोजी मुंबई–गोवा महामार्गावरून गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामार्गे रत्नागिरीच्या राजापूरकडे गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर सापळा रचला.
या कारवाईदरम्यान सदर आयशर टेम्पो अवैधरित्या दारू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे १५० बॉक्स आढळून आले.
या कारवाईत ७ लाख २० हजार रुपये किंमतीची दारू तसेच आयशर टेम्पो असा एकूण १७ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, सखाराम भोई, आनंद पालव, योगेश वेंगुर्लेकर, कृष्णा परुळेकर, स्वप्नील चव्हाण तसेच होमगार्ड मेस्त्री यांनी केली, अशी माहीती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.









