ग्रामस्थांची महावितरण अधिका-यांकडे मागणी
देवेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील चेंदवण–वेलवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला वीज ट्रान्सफार्मर अखेर मंजूर झाल्यानंतर त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी बुधवारी कुडाळ येथील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली.
माजी उपसरपंच सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जि.प.चे माजी अध्यक्ष संजय पडते, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, तालुका प्रमुख दीपक नारकर, उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांच्या सहकार्याने आमदार निलेश राणे यांचे याबाबत लक्ष वेधले होते. त्यानंतर आ.निलेश राणे यांच्या प्रयत्नातून हा ट्रान्सफार्मर मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या ट्रान्सफार्मरचे प्रत्यक्ष काम तातडीने सुरू व्हावे, या मागणीसाठी चेंदवणचे माजी सरपंच व शिवसेना उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची कुडाळ येथे भेट घेण्यात आली. यावेळी चेंदवण उपशाखा प्रमुख भास्कर ठुंबरे, प्रकाश ठुंबरे तसेच चेंदवण–वेलवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ट्रान्सफार्मरमुळे परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. काम तातडीने सुरू करून लवकर पूर्ण करण्याची मागणी यावेळी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.









