स्त्री शक्तीचा जागर; ७०० हून अधिक महिलांचा सहभाग
स्थानिक कापड व्यावसायिकांचा जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवारी येथे ‘कुडाळ साडी वॉकेथॉन – २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ महिलांसाठी असून स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आला आहे. यात सुमारे ७०० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत, ही साडी वॉकेथॉन यशस्वी झाली अशी माहीती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
रविवारी सकाळी कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृह येथून या वॉकेथॉनला प्रारंभ झाला. या स्पर्धेत महिला साडी परिधान करून सहभागी झाल्या. दीड किलोमीटर व तीन किलोमीटर अशा दोन गटांत ही साडी वॉकेथॉन घेण्यात आली. दीड किलोमीटर वॉकेथॉनचा मार्ग महालक्ष्मी सभागृह (गुलमोहर हाॅटेल) – भैरव मंदिर – बस स्थानक – बाजारपेठ वर्दम तिठा – पानबाजार – पुन्हा महालक्ष्मी सभागृह असा राहणार आहे. तर तीन किलोमीटर वॉकेथॉनचा मार्ग महालक्ष्मी सभागृह – भैरव मंदिर – बस स्थानक – नक्षत्र टॉवर – जिजामाता चौक – पोस्ट कार्यालय – पोलीस ठाणे – छत्रपती संभाजी महाराज चौक – पुन्हा पोलीस ठाणे – जिजामाता चौक – नक्षत्र टॉवर – बस स्थानक – बाजारपेठ वर्दम तिठा – पानबाजार – महालक्ष्मी सभागृह ठेवण्यात आला होता. या वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांचा आयोजकांच्या वतीने गौरविण्यात आले.







