सात–आठ गवारेड्यांचा बिनधास्त वावर; उन्हाळी पिकांना धोका
वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील गोवेरी–म्हारसेवाडी परिसरात गवारेड्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी या परिसरातील ग्रामस्थ प्रथमेश तेंडोलकर यांना सुमारे सात ते आठ गवारेड्यांचा कळप निदर्शनास आला. सदर गवारेडे बिनधास्तपणे शेतजमिनी व वस्तीच्या जवळ वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी सध्या उन्हाळी मिरची, शेंगदाणा, कुळीथ तसेच विविध भाजीपाला पिकांची लागवड केलेली आहे. गवारेड्यांच्या वावरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. गवारेड्यांचा कळप वारंवार दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने दखल घेऊन गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.वनविभागाने त्वरित उपाययोजना करून परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









