ठळक घडामोडी

नेरूर देऊळवाडा येथे उद्या ७ मार्चला महसूल समाधान शिबिर!

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत उपक्रम

महसूल विभागाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी – कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
      महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान (टप्पा–१)’ अंतर्गत कुडाळ तहसील कार्यालयामार्फत वालावल मंडळ स्तरावर शनिवार दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, नेरूर देऊळवाडा सभागृह येथे महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
    कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांना महसूल विभागातील विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, ‘सनद’ प्रक्रियेची माहिती आदी सेवांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच संजय गांधी सामाजिक अर्थसहाय्य योजना, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, Agristack शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्डवरील नाव कमी-जास्त करणे तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगीसंबंधी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कामेही या शिबिरात केली जाणार आहेत. संबंधित सेवांसाठी अर्जही स्वीकारले जाणार आहेत. तरी कुडाळ तालुक्यातील वालावल मंडळातील गावांतील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराला उपस्थित राहून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!