वाढदिवसाच्या व्यासपीठावरून आ. निलेश राणेंनी भावासाठी व्यक्त केल्या भावना
वाढदिवसानिमित्त आमदार निलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
कुडाळ : प्रतिनिधी
पालकमंत्री नितेश राणे हे माझे भाऊ आहेत आणि त्यांचा मला नेहमीच भक्कम पाठबळ राहिले आहे. बाहेर कोणी काहीही वावड्या उठवू दे किंवा ‘स्टोरी’ तयार करू दे, पण माझं आणि नितेशचं नातं वेगळं आणि अतुट आहे, अशा शब्दांत आमदार निलेश राणे यांनी आपल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात विरोधकांना ठणकावून सांगितले.
कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानात आज आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यात निलेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राणे समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या विधानाचे स्वागत केले.
बंधुप्रेमाची जाहीर कबुली
अनेकदा राजकीय वर्तुळात दोन भावांच्या भूमिकेवरून उलट-सुलट चर्चा रंगवल्या जातात. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी जाहीर व्यासपीठावरून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की,आमच्यामध्ये कोणालाही फूट पाडता येणार नाही. नितेशचा सपोर्ट हीच माझी मोठी ताकद आहे. मंत्री नितेश राणे यांनीही यावेळी मोठ्या भावाचा केक भरवून आणि पुष्पहार घालून सत्कार केला, ज्यातून राणे कुटुंबातील एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
सोहळ्याचे खास आकर्षण
राणे कुटुंबीयांचे आगमन होताच फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.यावेळी खा. नारायण राणे, सौ. निलम राणे,पालकमंत्री नितेश राणे,आ. निलेश राणे,यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
संपूर्ण परिसर निलेश राणे यांच्या समर्थनाार्थ दिलेल्या घोषणांनी दणाणून गेला.नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरू झालेल्या या सोहळ्याला कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावली होती. केक कापल्यानंतर राणे परिवाराचे भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.









